शाहू महाराजांचा मोठा गौप्यस्फोट : संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही भाजपची खेळी होती !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : शिवसेना आणि संभाजीराजे यांच्यात जो ड्राफ्ट तयार झाला होता तो कच्चा ड्राफ्ट होता, असा दावा करत “हा छत्रपती घराण्याचा अपमान नव्हे. तर मुळात संभाजीराजेंनी पक्ष घोषित करणं हे सुद्धा चुकीचं होतं”, अशी परखड भूमिका मांडत शाहू महाराजांनी (Shahu Maharaj) छत्रपती संभाजी महाराजांचे कान टोचले. (Shahu Maharaj’s big blast, Sambhaji Raje’s independent fight was BJP’s game)

छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी राज्यसभेची अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला होता, मात्र त्यांना अपेक्षित पाठिंबा न मिळाल्याने त्यांनी राज्यसभेची निवडणूक न लढवण्याची घोषणा करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

संभाजीराजेंच्या एकुणच राजकीय भूमिकेवर वडील शाहू महाराजांनी माध्यमांशी बोलताना उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली.संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करणं, किंवा स्वतंत्र पक्ष काढणं योग्य नसल्याचं शाहू महाराज म्हणाले आहेत.

“मुख्यमंत्र्यांनी युटर्न घेतला. त्यांनी शब्द पाळला नाही”, असे आरोप संभाजीराजेंनी केले होते. ते आरोप बरोबर नाहीत, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली आहे. शाहू महाराजांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना अनेक गोष्टींचा उलगडा केलेला आहे.यातून त्यांनी थेट संभाजीराजेंना सुनावलं आहे.

राज्यसभेच्या जागेवर निवडणूक लढण्यासाठी शिवसेनेकडून अट ठेवण्यात आल्याच्या दाव्यावर त्यांनी भाष्य केलं. तसेच संभाजीराजेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची जी घोषणा केली त्याबाबत कुटुंबियांशी कोणतीची चर्चा केली नसल्याची माहिती शाहू महाराजांनी दिली. तसेच शिवसेनेकडून कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या नावाची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा आपण त्यांना प्रत्यक्ष फोन करुन अभिनंदन केलं, अशी प्रतिक्रिया शाहू महाराजांनी दिली.

संभाजीराजेंनी अपक्ष लढावं, ही भाजपची खेळी होती. बहुजन समाजामध्ये फूट पाडण्यासाठी भाजपने ही खेळी केल्याचा मोठा दावा शाहू महाराजांनी केला आहे. तसेच राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर संभाजीराजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते, अशी माहिती शाहू महाराजांनी दिली. फडणवीसांच्या भेटीनंतर संभाजीराजेंनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली.

त्यानंतर त्यांच्यासमोर स्वबळावर लढण्याचा किंवा इतर पक्षांचा पाठिंबा घेण्याचा असे दोनच पर्याय होते. याआधी भाजपने त्यांना राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा आम्ही त्यांना तो प्रस्ताव नाकारण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांनी ऐकलं नाही. ते राज्यसभेवर गेले. त्यानंतर त्यांनी जे जे राजकीय निर्णय घेतले त्याबाबत आपल्याशी चर्चा केली नाही, अशी माहिती शाहू महाराजांनी दिली.