राज्यातील 60 लाख महिलांसाठी ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : मासिक पाळी स्वच्छता दिनाचे (Menstrual Hygiene Day ) औचित्य साधत राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने दारिद्र रेषेखालील महिला व बचत गटाच्या महिला यांच्यासाठी एक मोठा निर्णय आज घेतला असून या निर्णयाचे राज्यभरातून स्वागत केले जात आहे. (60 lakh women in the state will get 10 sanitary napkins for one rupee, big decision of the Rural Development Department in Maharashtra Government)

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधत दारिद्र्यरेषेखालील महिला तसेच बचत गटांच्या महिलांसाठी एक रुपयांमध्ये 10 सॅनिटरी नॅपकिन देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे या घोषणेमुळे राज्यातील 60 लाख महिलांना आरोग्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे.

राज्यातील दारिद्र रेषेखालील महिला व बचत गटातील महिलांसाठी ग्राम विकास विभागाने हाती घेतलेल्या एक रुपयात दहा सॅनिटरी नॅपकीन  देण्याच्या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 पासून राज्यात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ट्विटवरून दिली आहे.

योजनेची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे

१. राज्यातील ग्रामीण भागातील स्वयंसहायता
समूहातील महिला व आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मासिक पाळी स्वच्छता संवर्धन योजनेतील सर्व महिला वगळून इतर दारिद्र्यरेषेखालील सर्व वयोगटातील युवती व महिलांना दर महिना एक रुपये नाममात्र शुल्कात
१० सॅनिटरी नॅपकिन असलेले एक पाकीट मिळणार.

२. स्थानिक पातळीवर गावस्तरावरच गावातील ग्रामसंघामार्फत महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून दिले जाणार.

३.शासन स्तरावर दर करार करण्यात येणार.

४. योजनेअंतर्गत महिलांना सॅनिटरी नॅपकीन किट याचा वापर करण्याबाबत, वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जागृती व प्रचार करणार.

५. सॅनिटरी नॅपकिन व्यवस्थापन व विल्हेवाट.

६. या योजनेत जवळपास ६० लाख पेक्षा जास्त लाभार्थी महिला असल्याने सॅनिटरी नॅपकिनचे विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक गावस्तरावर मशीन बसवण्यात येणार आहे.

या मशीनमार्फत महिलांनी सॅनिटरी नॅपकिनची विल्हेवाट लावावी, यासाठी जनजागृतीही करण्यात येणार आहेत. ही सर्व मशीन जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि
ग्रामपंचायत यांच्या स्वनिधीतून तसेच शासकीय निधी देणग्या तसेच सीएसआर निधीच्या माध्यमांतून बसविण्यात येणार आहेत.