‘त्या’ प्रकरणातील आरोपींना अटक करा, अन्यथा जामखेड बंदचे अंदोलन हाती घेणार – उद्योजक रमेश आजबे यांचा इशारा !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड शहरातील अंदूरे कुटुंबातील सदस्यांना मारहाण होण्याची घटना घडून एक महिना उलटून गेला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत.त्यांच्यासह इतर आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी उद्योजक रमेश आजबे हे आक्रमक झाले आहेत.अंदुरे प्रकरणातील सर्व आरोपींची येत्या मंगळवारपर्यंत अटक न झाल्यास बुधवारपासून व्यापाऱ्यांच्या वतीने जामखेड शहर बंद ठेवण्याचा इशारा उद्योजक रमेश (दादा) आजबे यांनी दिला आहे.

Arrest the accused in that case or Jamkhed Bandh, Entrepreneur Ramesh Ajbe's warning, Jamkhed latest news,

उद्योजक रमेश (दादा) आजबे यांनी गुरूवारी 1 रोजी जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी आक्रमक भूमिका जाहिर केली. यावेळी पुढे बोलताना आजबे म्हणाले की, खुनाचा प्रयत्न करणे व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी डॉ भगवान मुरुमकर यांच्यावर गुन्हा दाखल असुनही त्यांच्या वाढदिवसाचे जामखेड शहरातील चौका चौकात बोर्ड लावले आहेत, याकडे पोलिसांचे लक्ष नाही, जामखेड पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे बोलताना रमेश आजबे म्हणाले की, एक महीन्या पुर्वी अंदुरे कुटूंबावर डॉ भगवानराव मुरुमकर यांच्या टोळीने हल्ला केला होता. या प्रकरणी या टोळीवर खुनाचा प्रयत्न करण्यासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपी राजरोसपणे तालुक्यात फिरत आहेत. तसेच व्हॉटसअप व फेसबुकच्या माध्यमांतून लोकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्या अनेक पोस्ट सोशल मिडीयावर झळकत आहेत. पोलीस प्रशासनाला हे दिसत नाहीत का? असा सवाल आजबे यांनी उपस्थित केला आहे.

आजबे पुढे म्हणाले की, १ डिसेंबर रोजी अंदुरे प्रकरणातील आरोपी आसलेल्या डॉ भगवान मुरूमकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील चौका चौकात शुभेच्छांचे बोर्ड लागले आहेत. याबाबत त्यांनी प्रशासनाची परवानगी घेतली आहे का ? परवानगी घेतली नसेल तर त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई का करण्यात आली नाही ? असा सवाल आजबे यांनी उपस्थित केला आहे.

व्यापारी अंदुरे कुटूंबावर हल्ला करणाऱ्या फरार आरोपींचे शहरात ठिक ठिकाणी बोर्ड लागले आहेत, आमचे कोणी काहीही वाकडे करु शकत नाही, असा आरोपींचा समज निर्माण झाला आहे. तसेच जामखेड पोलीस स्टेशनला काही सिंघम म्हणवून घेणार्‍या अधिकार्‍यांनी अनेक गुन्ह्यांचा तातडीने तपास करून आरोपी अटक केले आहेत, परंतू अंदूरे प्रकरणाला महीना उलटून गेला तरी त्या प्रकरणातील आरोपींना अजून अटक केली नाही. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांची काही देवाण घेवाण तर झाली नाही ना? अशी दबक्या आवाजात चर्चा आहे, असा आरोपही रमेश आजबे यांनी यावेळी बोलताना केला.

अंदुरे प्रकरणातील आरोपींना मंगळवारपर्यंत अटक न झाल्यास बुधवारी जामखेड शहरातील व्यापाऱ्यांच्या समवेत जामखेड शहर बंद ठेऊन तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा उद्योजक रमेश आजबे यांनी दिला आहे.