जामखेड शहरातील डिजीटल फ्लेक्सचा मुद्दा पुन्हा तापला, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकर राळेभात यांनी केली मोठी मागणी, राळेभात यांनी पत्रकार परिषदेेत नेमकी काय भूमिका मांडलीय ? वाचा सविस्तर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड शहरातील डिजीटल फ्लेक्सचा (बोर्ड) मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे.चौका चौकात सराईत गुन्हेगारांचे फोटो असलेले बोर्ड शहरात झकळताना दिसत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे शहरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे, भीतीचे वातावरण पसरले आहे. डिजीटल बोर्डमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नगरपरिषद, पोलिस आणि तालुका प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात हे आता आक्रमक झाले आहेत. जामखेडमध्ये राळेभात यांनी पत्रकार परिषद घेत आपली रोखठोक भूमिका जाहीर केली.

issue of digital flex in Jamkhed city heated up again, NCP's senior leader Madhukar Ralebhat made big demand, jamkhed latest news,

गुन्हेगार प्रवृत्तींच्या लोकांचे जामखेड शहरातील चौका-चौकात लागणाऱ्या डिजीटल बोर्ड विरोधात मैदानात उतरलेल्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांची भेट घेत, शहराच्या कायदा व सुव्यवस्थेतला बाधा ठरणारे गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचे डिजीटल बोर्ड तातडीने हटवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 1 डिसेंबर रोजी सांयकाळी राळेभात यांनी ही मागणी केली आहे.

सामान्य माणसावर कधी हल्ला होईल हे सांगता येत नाही

यावेळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडताना राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात म्हणाले की, जामखेड शहराचा विचार केला तर सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र असलेलं हे शहर होतं, परंतू सध्या गुंडगिरीतून शहर भकास होतयं की काय ? अशी वेळ शहरावर आलेली आहे. शहरातील फिरून आलात तर लक्षात येईल कि, ज्यांनी खून केलेले आहेत, ज्यांनी हाफ मर्डर केलेले आहेत, अश्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या लोकांचे डिजीटल फ्लेक्स चौका चौकात लागलेले आहेत, खरं तर या फ्लेक्स आणि डिजीटल बोर्ड मुळे व्यापारी हा झाकून जातोय, व्यापाऱ्यांना दडपण आलेलं आहे, सर्वसामान्य जनतेला दडपण आलेलं आहे. सध्या जामखेड शहरातील व्यापारी आणि जनता दहशतीखाली वावरत आहे, असे राळेभात म्हणाले.

शहराचे रहिवासी नाहीत अश्या गुन्हेगारांचे बोर्ड शहरात

पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेले लोकं आहेत. सामुहिक गुन्हेगारी करणारे लोकं आहेत यांचे मोठ मोठाले बोर्ड शहरात झळकत आहेत, जे जामखेड शहराचे रहिवासी नाहीत अश्याही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे बोर्ड शहरात झळकत आहेत.  त्यामुळे शहरातील व्यापारी चांगल्या प्रकारे श्वास घेऊ शकत नाही, सामान्य माणसावर कधी हल्ला होईल हे सांगता येत नाही, अशी परिस्थिती या शहरात निर्माण झाली आहे.

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी शहरात मांडलेय थैमान

राळेभात पुढे म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी जामखेड शहरात थैमान मांडले आहे. या लोकांचा त्वरीत बंदोबस्त झाला पाहिजे, यांचा बंदोबस्त झाला नाही तर या शहरातील व्यापारी केंद्र बाहेर जाताना दिसेल, सामान्य माणूस या शहरात राहणार नाही, या सगळ्या गोष्टींचा प्रशासनाने विचार केला पाहिजे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींना तांदळातील खड्यासारखं प्रशासनाने जामखेडमधून बाहेर काढायला हवं, असे अवाहन राळेभात यांनी जामखेड प्रशासनाला केलं आहे.

चांगल्या प्रकारे श्वास घेता यावा असा प्रयत्न प्रशासनाकडून होणे आवश्यक

पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, मागच्या महिन्यात शहरातील एका व्यापाऱ्यावर हल्ला होतो, हल्लेखोर आणि त्याचे साथीदार मोकाट फिरतात,त्यांचे बोर्ड शहरात लागले जातात, हे कुठल्या पध्दतीचं राजकारण आहे ? याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत राळेभात म्हणाले की जामखेड शहराला चांगल्या प्रकारे श्वास घेता यावा असा प्रयत्न प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे.

गुन्हेगारांचा त्वरीत बंदोबस्त झाला पाहिजे

राळेभात पुढे म्हणाले की, जामखेड शहरात गुण्या गोविंदाने राहणारा सर्व समाजघटक, आज मात्र ऐकमेकांकडे धुमसून बघितल्यासारखा राहतोय, त्याला कारण शहरात लागणारे फ्लेक्स आणि डिजीटल बोर्ड आहेत, त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की,शहरातील सर्व डिजीटल बोर्ड बंद झाले पाहिजेत आणि गुन्हेगारांचा त्वरीत बंदोबस्त झाला पाहिजे.

नगरपरिषदेने ऊठसूट कोणालाही परवानगी नाही दिली पाहिजे

नगरपरिषदेने डिजीटल बोर्डच्या बाबतीत व्यापाराच्या दृष्टीने बघितले नाही पाहिजे, कोणाचे बोर्ड लागतात ? का लागतात? त्याच्यावर आगोदर त्यांनी पाहणी केली पाहिजे, ते बोर्ड या शहराचं नावलौकिक वाढवणारे असतील तर अश्याच व्यक्तीचे बोर्ड लागले पाहिजेत, शहराच्या विकासात वाढ करणारे बोर्ड असले पाहिजेत, शहर झाकून टाकणारे बोर्ड नसले पाहिजेत,  नगरपरिषदेने कोणालाही ऊठसूट परवानगी नाही दिली पाहिजे,अशी भूमिका यावेळी राळेभात यांनी मांडली.

गाव भकास होऊ न देणं ही माझी जबाबदारी

जर प्रशासनाने डिजीटल बोर्डवर आवर घातला नाही तर आम्हाला स्वता:ला या शहराचा नागरिक म्हणून, या गावचा जन्मल्यापासूनचा रहिवासी म्हणून हे गाव भकास होऊ न देणं ही माझी जबाबदारी आहे तसेच शहरातील सर्व लोकांची जबाबदारी आहे.आपला जीव गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांमुळे  कोंडीत धरला जातो की काय ही शहरातील सर्व नागरिकांची भावना झाली आहे. शहरातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कायमस्वरूपी उठाव करत राहणार आणि मी स्वता: कायमस्वरूपी हे बंद करणार आहे,असा इशारा यावेळी राळेभात यांनी दिला आहे.