विना रिफलेक्टर ऊस वाहतुकीचा जामखेड तालुक्यात पहिला बळी, रयत सेवक बाबू भोसले यांचा अपघाती मृत्यू !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यात विना रिफलेक्टर ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरने पहिला बळी घेतल्याची धक्कादायक घटना 19 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेत खांडवी येथील बाबू भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. भोसले हे रयत शिक्षण संस्थेच्या अरणेश्वर विद्यालय अरणगाव येथे कार्यरत होते.

Accidental death of Ryat Sevak Babu Bhosale, first victim of without reflectors sugarcane transport in jamkhed taluka

जामखेड – करमाळा, झिक्री – हळगाव या मार्गावर सध्या मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतुक सुरु आहे. या मार्गावर ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रकची वाहतुक सुरु आहे. या मार्गावर दोन-दोन तीन-तीन ट्रॅक्टर सलग ऊस वाहतुक करतात. यामुळे लहान वाहनधारक आणि मोटारसायकल यांना वाहतुक करताना प्रचंड त्रासास सामोरे जावे लागते. विशेषता: ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागील बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने वाहनधारकांना ट्रॅक्टरचा अंदाज येत नाही. यामुळे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत, अशीच एक अपघाताची घटना आज 19 डिसेंबर 2022 सायंकाळी घडली आहे.

जामखेड तालुक्यातील खांडवी येथील रयतसेवक बाबू भोसले हे आपल्या पत्नीसमवेत मोटारसायकलवरून जामखेडच्या दिशेने येत होते. सायंकाळी झिक्री येथील लोकसेवा मंगल कार्यालयाजवळ त्यांची मोटारसायकल आली असता, समोर चाललेल्या ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे भोसले यांच्या मोटारसायकलची सदर ट्रॅक्टरच्या ट्राॅलीला पाठीमागून जोराची धडक बसली. यावेळी झालेल्या भीषण अपघातात बाबू भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना जामखेडमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

मयत बाबू भोसले हे  रयत शिक्षण संस्थेच्या अरणगाव येथील अरणेश्वर विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. भोसले हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक अपघाती निधनामुळे अनेकांना धक्का बसला आहे. बाबू भोसले यांच्या निधनामुळे संपूर्ण जामखेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अपघातानंतर बाबू भोसले यांचा मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला. त्यांच्यावर या ठिकाणी डाॅ युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले.ग्रामीण रुग्णालयात भोसले यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली आहे. उद्या भोसले यांच्यावर खांडवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भोसले यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई हाती घ्यावी..

जामखेड तालुक्यातून ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रक ही विना रिफलेक्टर सर्रास ऊस वाहतुक करत आहेत. यांच्यावर वेळीच कारवाई झाली असती तर रयत सेवक बाबू भोसले यांचा नाहक बळी नसता गेला. आता तरी प्रशासनाने आणखीन बळी जाण्याची वाट न बघता तातडीने विना रिफलेक्टर ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई हाती घ्यावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.