विधायक : पोषित बालकांच्या वजनाइतका पौष्टिक आहार अंगणवाड्यांना दान, जामखेड तालुक्यात राष्ट्रीय पोषण महिना विविध उपक्रमांनी साजरा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने जामखेड तालुक्यातील कुपोषित मुलांच्या आहारासाठी दानशूर व्यक्तींनी मदत करावी यासाठी पोषण तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोषित बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांच्या वजनाइतका पौष्टिक आहार अंगणवाड्यांना दान केला. जामखेडमध्ये 30 सप्टेंबर 2022 रोजी हा कार्यक्रम पार पडला.

Nutritional food equal to the weight of nourished children is donated to Anganwadis, National Nutrition Month is celebrated in Jamkhed taluka with various activities, Donation of 400 kg nutritional food

केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार एक सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. जामखेड तालुक्यात राष्ट्रीय पोषण महिना विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.30 सप्टेंबर रोजी पोषण महिन्याचा समारोप करण्यात आला.

जामखेड येथील ल.ना.होशिंग विद्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात 125 किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी व एचबी तपासणी करण्यात आली.

तसेच प्रत्येक अंगणवाडीमध्ये स्वस्थ बालक बालिका स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामधील तालुकास्तरीय प्रथम तीन क्रमांक व उत्तेजनार्थ क्रमांक यांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला.

तसेच पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच इच्छुक व दानशूर पालक यांनी आपल्या मुलांची पोषण तुला करून तेवढ्या प्रमाणात पौष्टिक आहार अंगणवाडीतील कुपोषित बालकांसाठी दान केला. यातून साडे तीनशे ते चारशे किलो पौष्टिक आहार जमा झाला.

यामध्ये 70 किलो शेंगदाणे, 70 किलो गूळ, 50 किलो सफरचंद, 70 डझन केळी,आठ किलो फुटाणे, पाच किलो डाळी, विविध कडधान्य ,काजू ,बदाम, खजूर ,राजगिरा लाडू ,भरडा असे विविध पदार्थ लोकसभागातून प्राप्त झाले.

सदर जमा झालेले पौष्टिक पदार्थ सॅम श्रेणीतील कुपोषित बालकांना दररोज अंगणवाडी केंद्रात दिले जाणार आहेत. यातून सॅम श्रेणीतील बालकांची वजन वाढ होण्यास मदत होणार आहे. 

Nutritional food equal to the weight of nourished children is donated to Anganwadis, National Nutrition Month is celebrated in Jamkhed taluka with various activities, Donation of 400 kg nutritional food

यावेळी प्रांताधिकारी डाॅ अजित थोरबोले, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, जामखेड तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती बेल्हेकर, जामखेड तालुका आरोग्य अधिकारी डाॅ सुनिल बोराडे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, कृषी अधिकारी अशोक शेळके, प्राचार्य श्रीकांत होशिंग, सह आदी अधिकारी, कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, पालक, किशोरवयीन मुली व छोटी बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका व बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या विविध पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन संपन्न झाले.