कर्जत तालुक्यातील रस्त्यांसाठी 12 कोटी 40 लाखांचा निधी मंजुर, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला आले आणखीन एक मोठे यश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पुढाकारातून विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 मधून कर्जत-जामखेड मतदारसंघात कोट्यावधींचा निधी मंजुर होऊ लागला आहे. काही दिवसांपुर्वी मतदारसंघातील 10 रस्त्यांसाठी 39 कोटींचा निधी मंजुर झाल्यानंतर आता कर्जत तालुक्यासाठी 12 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा 2 मधून कर्जत तालुक्यातील 4 रस्त्यांसाठी 12 कोटी 40 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. यातून 14 किलोमीटरचे रस्ते होणार आहेत. ही कामे जिल्हा वार्षिक योजना (DPC) या हेडखाली होणार आहेत. सदर कामांना मंजुरी मिळाली यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. ग्रामविकास विभागाकडून सदर कामांना प्रशासकीय मान्यता देणारा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामविकास विभागाकडून जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार कर्जत तालुक्यातील कोरेगाव ते आळसुंदे (सटवाईवाडी मार्गे ) शेगुड या 5.600 किलोमीटर रस्त्यासाठी 5 कोटी 99 लाख 21 हजार रूपये, टाकळी खंडेश्वरी ते थापलिंग मंदिर ते पाटेगाव मलठण या 3.450 किलोमीटर रस्त्यासाठी 2 कोटी 58 लाख 11 हजार रूपये, मिरजगाव ते शिवाचा मळा ते रवळगांव या तीन किलोमीटर रस्त्यासाठी 2 कोटी 33 लाख 93 हजार रूपये तर प्रजिमा 66 ते रेहकुरी ते प्रजिमा 115 या 2.100 किलोमीटर रस्त्यासाठी 1 कोटी 48 लाख 85 हजार रूपये असा एकुण 12 कोटी 40 लाख इतका निधी मंजुर झाला आहे.
यापुर्वी राज्यनिधीतून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा 2 साठी मतदारसंघातील 6 रस्त्यांच्या कामासाठी 18 कोटी 73 लाख 87 हजार रूपये इतका निधी मंजुर झाला होता. तसेच आशियाई विकास बँक अर्थसहाय्य अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 4 रस्त्यांची कामे मंजुर झाली होती, यासाठी 20 कोटी 19 लाख रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. आता कर्जत तालुक्यातील 4 रस्त्यांसाठी 12 कोटी 40 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. एकुण 51 कोटी 32 लाख 87 हजार इतका निधी मागील 15 दिवसांत मतदारसंघासाठी मंजुर झाला आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील अनेक महत्वाच्या गावांना जोडणारी रस्ते डांबरीकरणाने जोडावीत अशी मागणी या भागातील जनतेकडून आमदार प्रा राम शिंदे यांच्याकडे सातत्याने होत होती, याच मागणीचा विचार करून आमदार प्र.राम शिंदे यांनी शासन दरबारी पाठपुरावा हाती घेतला होता. याला मोठे यश येताना दिसत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 2 मधून मतदारसंघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांना कोट्यावधीचा निधी मंजुर होऊ लागला आहे. यामुळे मतदारसंघात जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून व्हावीत यासाठी आमदार प्रा राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि खासदार डॉ.सुजय विखे-पाटील यांनी शासनदरबारी जोरदार पाठपुरावा केला होता. यामुळे गेल्या 15 दिवसांत मतदारसंघात 51 कोटींपेक्षा अधिक रकमेची रस्त्यांची कामे मंजुर झाले आहेत.