अवकाशातून कोसळलेल्या  कृत्रिम उपग्रहाचे अवशेष सापडले महाराष्ट्रात

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शनिवारी संध्याकाळी अवकाशात घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली. विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव, अहमदनगरच्या काही भागात अवकाशातून जमिनीच्या दिशेने प्रकाशमान वस्तू येत असल्याचे दिसत होते. याचे व्हिडीओ सोशल मिडीयावर जोरदार वायरल झाले होते.आज यासंबंधी महत्वाची माहिती समोर आली आहे. (Remains of an artificial satellite that crashed from space were found in Maharashtra Chandrapur)

शनिवारी रात्रीच्या सुमारास अवकाशातून ज्या प्रकाशमान वस्तू पृथ्वीच्या दिशेने येत असल्याच्या दिसून आल्या होत्या तो उल्कापात अथवा उडत्या तबकडीचा प्रकार नसून कृत्रिम उपग्रहाचे अवशेष पडल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील काही भागात कृत्रिम उपग्रहाचे अवशेष रविवारी आढळून आले आहेत.

चंद्रपुर जिल्ह्यातील सिंदेवाही येथील लाडबोरी गावात शनिवारी रात्री आकाशातून रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली. हे अवशेष बंद पडलेल्या सॅटेलाईटचे असल्याची माहिती आहे. तर रविवारी सकाळी सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गुंजेवाहीजवळ गोल आकाराचा अवशेष नागरिकांना मिळाला आहे.हा अवशेष हायड्रोजन टँकसारखा दिसत असून त्याचा उपयोग सॅटेलाईटमध्ये उपकरण सिस्टीम सारखा केला जातो.

सध्या अभ्यासक यावर संशोधन करीत असून याबाबत लवकरच अचूक माहिती पुढे येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान सिंदेवाही परिसरातील या दोन्ही गावांना अभ्यासक सकाळपासून भेटी देत आहेत. लोखंडी रिंग इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचेच तुकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.

न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने सायंकाळी उत्तर – पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडीसारखी घटना नाही असा दावा एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे. दरम्यान याबाबत जिल्हा प्रशासन अधिकृत माहिती घेत आहेत.

दरम्यान ट्विटरवरील BNO NEWS या अकाऊंटने वेगळाचा दावा केला आहे. BNO न्यूजच्या म्हणण्यानुसार एका चिनी राॅकेटने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि भारताच्या अवकाशात आग लागली असे म्हटले आहे. यावृत्ताकडेही भारत सरकारने गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.