पश्चिम महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : गुढी पाडव्याच्या दिवशी भाजपला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला, पक्षाच्या एका माजी आमदाराने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षाला राम राम ठोकला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत या माजी आमदाराने राष्ट्रवादीत आपल्या हजारो समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. (Big blow to BJP in Western Maharashtra, bjp leader shivajirao naik join NCP today)

आगामी २०२४ च्या विधानसभेच्या तयारीत सगळेच पक्ष सरसावले आहेत, राष्ट्रवादीनेही आपली तयारी सुरु केली आहे. अनेक जिह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी बड्या नेत्यांना पक्षात घेण्याचे सत्र राष्ट्रवादीने हाती घेतले आहे. त्याचाच भाग म्हणून राष्ट्रवादीने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सांगली जिल्ह्यात भाजपला भगदाड पाडले. सांगली जिल्ह्यातील माजी आमदार तथा माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपला सोडचिट्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

शिवाजराव नाईक हे सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपा कडून निवडणूक लढले होते, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, ७६ हजाराहून अधिक मते त्यांनी या निवडणुकीत घेतले होते.चंद्रकांत पाटील यांच्यामुळे आपला पराभव झाला होता असा आरोप नाईक यांनी केला होता. चंद्रकांत पाटील यांनी योग्य न्याय केला नसल्याचा आरोप करत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील सह आदी नेत्यांच्या उपस्थितीत नाईक राष्ट्रवादीत दाखल झाले.

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे भाजपला सांगली जिल्ह्यात मोठे भगदाड पडले आहे, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नाईक यांचा राष्टवादी प्रवेश राष्ट्रवादीची ताकद वाढवणारा आहे.दरम्यान नाईक यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आरोप करत पक्ष सोडल्याने पश्चिम महाराष्ट्रात याचे मोठे पडसाद आगामी काळात उमटताना दिसणार आहेत.