राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत गडगडाटासह पाऊस

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांचे तापमान ४१ अंशांच्या पुढे गेले आहे. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उष्णतेपासून येत्या काही दिवसांत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Rain with thunderstorms in the next four to five days in Maharashtra)

महाराष्ट्रातील काही भागात पुढील चार ते पाच दिवसांत गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४३.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. विदर्भातील अकोला, चंद्रपूर, अमरावती या परिसरात उष्णतेची लाट आली आहे. ही लाट आणखी दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४० अंशाचे पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात बुधवार व गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

राज्यात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेपासून येत्या चार ते पाच दिवसांत काहीसा दिलासा मिळू शकतो, राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत गडगडाटासह पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. यासंबंधी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ के एस होसळीकर यांनी ट्विट केले आहे.

दरम्यान शेतकरी बांधवांनी येत्या आठवड्यात होणार्‍या पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे अवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)

अहमदनगर ४१, पुणे ३९.७, लोहगाव ३९.६, कोल्हापूर ३८.३, महाबळेश्वर ३२.९, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.७, सांगली ४०.२, सातारा ३९.५, सोलापूर ४२.८, मुंबई ३२.७, सांताक्रूझ ३१.८, रत्नागिरी ३१.६, पणजी ३३.३, डहाणू ३३.७, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.२, नांदेड ४१.८, अकोला ४३.५, अमरावती ४२, बुलडाणा ४०.२, ब्रम्हपुरी ४१.६, चंद्रपूर ४३.४, गोंदिया ४१, नागपूर ४१.१, वाशिम ४१, वर्धा ४२.४.