नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केली 122 कोटींची मदत !

state government has announced Rs 122 crore for affected farmers

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसानीची मदत मिळावी यासाठी शेतकरी आक्रोश करत आहेत. काही भागात पंचनाम्याची प्रतिक्षेत शेतकरी आहेत. मराठवाड्यात तर अनेक भागात यंदा भीषण पाऊस झाला. यंदा राज्यात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. शेतकरी राजा मात्र चांगलाच अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. (state government has announced Rs 122 crore for affected farmers)

दरम्यान आता यावरच सरकारने सकारात्मक पावलं उचलायला सुरूवात केली आहे. सरकारने आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीतून दिलासा देण्यासाठी मदतीची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जिरायती शेतीसाठी प्रति हेक्टर 6 हजार 800 रूपये मदत मिळणार आहे तर बागायती शेतीसाठी सरकारकडून प्रति हेक्टर 13 हजार 500 रूपयांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. ही मदत येत्या 4 ते 5 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.

मार्च,एप्रिल व मे 2021 या कालावधीत कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांमध्ये गारपीट व अवेळी पावसामुळे शेतपिकाच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासाठी 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

शेतीपिकाच्या झालेल्या नुकसानासाठी मदत करण्याकरिता केंद्रीय आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य  आपत्ती प्रतिसाद निधी दरानुसार मदत अनुज्ञेय करून एकूण 122 कोटी 26 लाख 30 हजार इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

कोकण विभागासाठी 29 लाख 30 हजार, पुणे विभागासाठी 03 कोटी 16 लाख 75 हजार, नाशिक विभागासाठी 59  कोटी 36 लाख 34 हजार, औरंगाबाद  विभागासाठी 15 कोटी 51 लाख 54 हजार, अमरावती विभागासाठी 38 कोटी 87 लाख 56 हजार, नागपूर विभागासाठी 05 कोटी 04 लाख 81  हजार रुपये  इतका निधी मंजूर झाला आहे असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.