section 144 | अहमदनगर जिल्ह्यात मंदिरे उघडली पण या ‘सहा’ मंदिर परिसरात कलम 144 लागु

Temples were opened in Ahmednagar district but section 144 was applicable in these 'six' temple areas

 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरे आजपासून खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. आज पहाटेपासूनच राज्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केलीय. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सहपरीवार मुंबादेवीचे दर्शन घेतले तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले.

घटस्थापनेपासुन भाविकांना मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेता येणार आहे, याचा एक वेगळा आनंद भाविकांना असणार आहे. पण राज्यातल्या काही जिल्ह्यांत मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही सुरुच आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यांतल्या 6 मंदिर परिसरात कलम 144 लागू करण्याचा निर्णय अहमदनगर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

6 मंदिर परिसरामध्ये 144 कलम लागू

नगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नवरात्रीच्या संपूर्ण काळात जिल्ह्यातील 6 मंदिर परिसरामध्ये 144 कलम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाथर्डी, राशीन, केडगाव आणि नगर शहरातील तीन देवीच्या मंदिर परिसरात कलम 144 लागू असणार आहे. यावेळी भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात काय म्हटलंय?

ऑनलाईन पास घेऊन भाविकांना दर्शन घेता येणार आहे. एक देवस्थानाच्या ठिकाणी रोज 5000 हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे आदेश लागू केलेले आहेत. नगर जिल्ह्यातल्या 6 देवस्थानच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन मंदिर परिसरात यात्रा भरविण्यास मज्जाव करण्यात आलाय. तसंच खेळणीची दुकाने आणि इतरही कोणत्याही दुकाने लावता येणार नाहीत. तसे आदेशच नगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत. आजपासून 20 तारखेपर्यंत हे आदेश लागू असणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात या धार्मिक प्रार्थनास्थळी 144 कलम लागू

1. श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे, ता.पाथर्डी ( मोहटा देवी मंदीर)

2. श्री जगदंबा देवी मंदीर, राशीन, ता.कर्जत

3. रेणूका माता देवी मंदीर, केडगांव ता.अहमदनगर

4 रेणूका माता देवी मंदीर, एम.आय.डी.सी. अहमदनगर

5 रेणूका माता देवी मंदीर, भिस्तबाग, पाईपलाईन रोड, अहमदनगर

6 तुळजा भवानी मंदीर, बु-हाणनगर ता.अहमदनगर