पोलिस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्यावर गोळीबार; गोळीबाराच्या घटनेने अहमदनगर जिल्हा हादरला

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षकाने जिल्हा पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्यावर गोळीबार करण्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली आहे. गोळीबाराच्या घटनेत मिटके हे थोडक्यात बचावले. या घटनेमुळे जिल्हा हादरून गेला आहे. ही थरारक घटना राहुरी तालुक्यातून समोर आली आहे.(In Rahuri, accused opened fire on Deputy Superintendent of Police Sandeep Mitke )

राहुरी तालुक्यातील डिग्रज येथे एका निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बंदुकीच्या धाकावर  जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्य वैशाली नानोर यांच्या मुलांना डांबून ठेवले होते. या मुलांची सुटका करण्यासाठी पोलिस फौजफाटा दाखल झाला होता. यावेळी रंगलेल्या थरारनाट्यात आरोपीच्या बंदुकीतून पोलीस उपअधीक्षक संदिप मिटके यांच्यावर गोळीबार झाला.या हल्ल्यात मिटके थोडक्यात बचावले. ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजता घडली.

आरोपी हा पुणे येथील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. त्याने गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास नानोर यांच्या घरात प्रवेश केला. बंदुकीचा धाक दाखवून लहान मुलांना डांबून ठेवले. आरोपीने त्यांच्या डोक्याला बंदूक रोखून धरले होते.

नानोर यांनी प्रसंगावधान राखत मोबाईल वरून घटनेची माहिती नातेवाईकांना व परिचितांना दिली.  त्यामुळे थोड्याच वेळात तेथे पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. उपधीक्षक संदिप मिटके दाखल झाले होते. दोन तास नाट्य सुरू होते. अखेर मिटके यांनी आरोपीवर झडप घातली परंतु आरोपीकडील बंदुकीची गोळी सुटली आणि ती मिटके यांच्या डोक्यात जवळून गेली. मिटके थोडक्यात बचावले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी याने दोन दिवसांपूर्वी नानोर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांने खंडणी  मागितली होती. राहुरी पोलिस ठाण्यामध्ये त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. हा गुन्हा मागे घेण्यासाठी आरोपीने नानोर यांना मुलांना बंदुकीच्या धाकावर डांबून ठेवल्याचे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्हात मोठी खळबळ उडाली आहे.