सोमय्या पिता पुत्र हाजीर हो.. INS विक्रांत प्रकरणी पोलिसांनी बजावले समन्स

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : आयएनएस विक्रांत प्रकरणात दोन दिवसांपुर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात ट्रॉम्बे पोलिस स्टेशनने भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्यांना आज समन्स बजावले आहे. (Somaiya’s father and son were summoned by the police in INS Vikrant case)

आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी गोळा करण्यात आलेल्या पैशात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता.माजी सैनिक बबन भोसले यांनी याच प्रकरणावरून ट्रॉम्बे पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्या विरोधात मुंबईतील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातकलम 420, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात सोमय्या पिता पुत्रांविरोधात पोलिसांनी समन्स बजावले आहे.

किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना उद्या 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ट्रॉम्बे पोलिस स्टेशनला हजर रहावे लागणार आहे.  मुंबई पोलिसांनी सोमय्या पिता पुत्रांविरोधात कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केल्याने सोमय्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.