Breaking News । ॲड गुणरत्न सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई  : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक बंगल्यावर हल्ला करण्यास एस टी कर्मचाऱ्यांना चिथावणी देणाऱ्या ॲड गुणरत्न सदावर्ते यांना मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी सायंकाळी चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्यानंतर सदावर्ते यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या ॲड.गुणरत्न सदावर्ते यांना (Gunratna Sadavarte) मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी आज रात्री 8 ते साडे 8च्या सुमारास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान येथे दिलेल्या भाषणात शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह टिका केली होती. त्यानंतर एस टी कामगारांनी शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर हिसंक आंदोलन केले होते. या अंदोलनात अंदोलकांकडून अर्वाच्च भाषेचा वापर करण्याबरोबरच दगडफेक, चप्पलफेक करण्यात आली होती.

त्यामुळे मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना चौकशीसाठी सायंकाळी आठच्या सुमारास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर सदावर्ते विरोधात भादंवि कलम 353, 333, 34 120 (ब) क्रिमिनल अबेटमेंट कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर निर्णय देताना संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांनी अजाद मैदानात जल्लोष केला होता. परंतू आज एसटी कामगारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर हिंसक पद्धतीने आंदोलन केले.

यावेळी पवार यांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी दगडफेक केली तसेच चपलाही फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. शरद पवारांच्या घरावर हल्ला निषेधार्ह असल्याच्या प्रतिक्रिया विविध स्तरातून व्यक्त झाल्या.

मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी २३ महिलांसह १०७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यानंतर, ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला,  गावदेवी पोलिसांनी सदावर्ते याला घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीनंतर सदावर्ते याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.