जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष शिगेला पोहचला आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले, मात्र तीन सुचवलेले चिन्हांचे पर्याय नाकारले, त्यामुळे शिंदे गट आज कोणत्या नविन चिन्हांचे पर्याय सादर करणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने आज सकाळी निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे तीन पर्याय पाठवले आहेत. यामध्ये रिक्षा, शंख, आणि तुतारी या चिन्हांचा समावेश आहे. तसेच आणखीन एक मेल आयोगाला पाठवला आहे, त्यात ढाल- तलवार, सुर्य आणि पिंपळाचे झाड या चिन्हाचा समावेश आहे अशी माहिती समोर येत आहे.
शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. या गटाला निवडणूक आयोगाकडून कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान दोन दिवसांपुर्वी रिक्षा हे चिन्ह सोशल मीडियावर जोरदार वायरल झाले होते. त्यामुळे आता शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणते चिन्ह मिळणार याचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दरम्यान काल निवडणूक आयोगाने उध्दव ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे. मात्र चिन्हा बाबत धार्मिक कारण देत दोन्ही गटाला धक्का दिला होता.
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकदा शिंदे यांच्या गटांमध्ये सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात वाद सुरू आहे .दोन्ही गटांनी शिवसेनेवर दावा केल्याने निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव वापरण्यास दोन्ही गटांना तात्पुरती बंदी घातली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी आपल्या गटांसाठी नाव आणि चिन्ह कोणते असावे याबाबत निवडणूक आयोगाला काल दुपारपर्यंत पर्याय देण्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे पर्याय सादर केले होते.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. तर शिंदे गटाने त्रिशूळ, गदा आणि उगवता सुर्य ही चिन्ह निवडणुक आयोगाकडे पाठवली होती. मात्र निवडणुक आयोगाने आता ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ चिन्ह बाद करत दोन्ही गटाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे. धार्मिक चिन्ह असल्याचे म्हणत आयोगानं ही दोन्ही चिन्ह नाकारली आहेत.
यानंतर निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरे यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी तीन पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘त्रिशूळ’ या चिन्हाची मागणी केली होती. मात्र हे चिन्ह धार्मिक असल्याचे म्हणत निवडणूक आयोगाने वापरास परवानगी नाकारली.
तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूमधील पक्षाचे चिन्ह असल्याचे जाहीर करत हे चिन्ह देखील वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे ठाकरे गटाला तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला चिन्हांसाठी तीन नवे पर्याय देण्याचे निर्देश दिले होते.