Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट सक्रीय, उष्माघात होऊ नये यासाठी काय करावे? काय करू नये ? जाणून घ्या सविस्तर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात उष्णतेची तीव्र लाट सक्रीय झाली आहे. चालू आठवड्यात उन्हाचा पार चांगलाच चढला आहे. अनेक भागात 40 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात उष्णतेची लाट (heat wave) सक्रीय होण्याबरोबरच ढगाळ हवामानामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे.अश्या परिस्थितीत काय काळजी घ्यावी यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रीय झाला आहे. राज्यातील नागरिकांचा उष्माघातापासून बचाव व्हावा यासाठी सरकारकडून मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनाही जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या सुचना जारी केल्या आहेत.

Severe heat wave active in Maharashtra, what to do to prevent heat stroke? What not to do? Know in detail,

आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र. उष्माघा/2023/प्र.क्र.38/आव्यप्र-1 दि.23/03/2023 अन्वये उन्हाळी हंगामातील उष्मा लाटेमुळे उदभवणा-या उष्माघाताने मानव, पशु-प्राणी यांच्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (काय करावे ?)

 • पुरेसे पाणी प्या, तहान लागली नसेल तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
 • घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.
 • दुपारी 12.00 ते 03.00 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
 • सूर्य प्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.
 • उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी प्रसार माध्यमांचा वापर करावा.
 • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
 • उन्हात काम करीत असल्यास कामगारांनी / व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा पांढरा रुमाल बांधावा किंबा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
 • प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ. आर. एस. घ्यावे, घरी तयार करण्यात आलेली लस्सी/ ताक/कैरीचे पन्हे/लिंबू पाणी इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा,
 • अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
 • गुरांना / पाळीव प्राण्यांना सावलीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना वेळेवर व पुरेसे पिण्याचे पाणी दयावे.
 • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
 • पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
 • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
 • सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
 • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा, तसेच बाहेर उन्हात काम करीत असतांना थोड्या अंतराने विश्रांती घ्यावी.
 • गरोदर स्त्रिया व आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी,

उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता (काय करु नये ?)

 • उन्हात अतिकष्टाचे कामे करु नका,
 • दारु, चहा, कॉफी आणि कार्यानेटेड थंड पेये घेऊ नका
 • दुपारी 12.00 ते 03.00 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.
 • उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका
 • लहान मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
 • गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
 • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत.
 • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.

सर्व नागरीकांनी उष्माघाताचे लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांना संपर्क साधावा. उष्मालाटेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, नागरिकांनी मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीमध्ये 1077, 1070, 100, 101, 102, 104, 108 व 112 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे अवाहन प्रशासनाने केले.

महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

राज्यात उष्णतेची लाट सक्रीय झाली आहे. त्याचबरोबर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यातील अनेक भागात ढगाळ हवामान आहे.  उत्तर- मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उष्णतेची लाट म्हणजे काय?

उष्णतेची लाट हा उच्च तापमानाचा कालावधी असतो, जो सामान्य तापमानापेक्षा जास्त असतो. उत्तर-पश्चिम आणि दक्षिम भागात साधारण मार्च ते जून दरम्यान उष्णतेची लाट पसरते. भारतीय हवामान विभागाच्या मते, जेव्हा सर्वोच्च तापमान मैदानी भागासाठी किमान 40.0°C आणि डोंगराळ प्रदेशांसाठी किमान 30.0°C पर्यंत पोहोचते तेव्हा ती उष्णतेची लाट मानली जाते. कमाल तापमान 45.0°C पेक्षा जास्त होते तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात आणि जेव्हा कमाल तापमान 47.0°C पेक्षा जास्त होते तेव्हा ती तीव्र उष्णतेची लाट म्हणून वर्गीकृत केली जाते.