राजकीय नेते आणि लग्नसोहळे ठरू लागले कोरोना सुपर स्प्रेडर  : 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । 1 जानेवारी । राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठा उद्रेक सुरू झाला आहे. विशेषता: मागील चार ते पाच दिवसांपासून कोरोनाचे रूग्ण दुपटीने वाढू लागले आहेत. एकिकडे शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक आदेश जारी करून कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पाऊले उचलली जात असतानाच राजकीय नेते, आमदार, खासदार, मंत्री कोरोना नियम धाब्यावर बसवत आहेत.

राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय कुटूंब लग्नसोहळे होत आहेत. त्याचबरोबर राज्यातील अनेक भागात मंत्री, आमदार, राजकीय नेते लग्नसोहळ्यांना हजेरी लावत आहेत. या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. हीच गर्दी कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरल्याची दिसू लागली आहे.

राज्यातील अनेक मंत्री, आमदार, खासदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून येऊ लागले आहेत. एकिकडे सामान्य जनतेवर कारवाईचा बडगा उगारला जातो तर दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होऊनही कारवाई मात्र शुन्य आहे. यामुळे सामान्य जनतेत संतापाची लाट पसरली आहे.

आधी राजकीय नेत्यांवर कारवाया करा मग आमच्यावर अशी सडेतोड भूमिका जनतेकडून घेतली जाऊ लागली आहे. यामुळे कोरोना निर्बंधाचे ठोस अंमलबजावणी करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. राजकीय नेते, मंत्री, आमदार, खासदार जर कोरोना नियमांचे खुलेआम उल्लंघन करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन कसे होणार हा खरा प्रश्न आहे.

राज्याचे माजी मंत्री तथा भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचा नुकताच मुंबईत विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात राज्यातील अनेक बड्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. विवाह सोहळ्यानंतर स्वता: हर्षवर्धन पाटील कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याबाबत त्यांनी ट्विटरवरुन माहिती दिली होती. या लग्नात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे सुध्दा उपस्थित होत्या.

अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय लोकार्पण सोहळ्यात महसुल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. याशिवाय माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या मुलाच्या विवाहात प्रचंड गर्दी झाली होती. या सोहळ्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री राम शिंदे, आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी उपस्थिती होती.  यानंतर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.कर्डिले यांच्या मुलाच्या लग्नसमारंभात उपस्थित असलेले अनेक नेते विनामास्क वावरत असल्याचे दिसून आलं होते. या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर वायरल झाला आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हेही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याशिवाय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महिला व बालविकास मंत्री ॲड यशोमती ठाकुर ह्याही कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात विखे, थोरात या मोठ्या नेत्यांच्या आधी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. विखे, थोरात, तनपुरे हे तीन बडे नेते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नवे निर्बंध लादले आहेत. परंतू या निर्बंधाना, नियमांना धाब्यावर बसवून राजकीय पुढारी सार्वजनिक कार्यक्रमात व्यस्त आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यावरच राजकीय नेत्यांना जाग येईल का ? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

दरम्यान राज्यात निर्माण झालेल्या कोरोना परिस्थिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, कोरोनामुळे राज्याची स्थिती वेगाने खराब होत आहे. काळजी घ्या, राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पवार पुढे म्हणाले, सगळ्यांनाच नियम पाळावे लागतील. स्थिती आणखीन बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल, पुण्या मुंबईची परिस्थिती चार दिवसांपासून वेगाने बघडत चालली आहे. मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स सोबत तीन तास बैठक घेतली. पुढे काय करायचं यावर चर्चा झाली. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, शर्यतीचे कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका, मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत त्याची अंमलबजावणी करा असे अवाहन पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे.