जमिनीवर पडलेली बिस्कीटे जबरदस्तीने खायला भाग पाडणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड परिसरात सराईत गुन्हेगारांचा उच्छाद सुरूच आहे. या गुन्हेगारांचा बिमोड करण्यासाठी पोलिसही सातत्याने कारवाया करताना दिसत आहेत. सराईत गुन्हेगारांचा आणखी एक कारनामा उघड होताच पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढल्याने हे प्रकरण चर्चेत आलं आहे.

‘मला भाई का नाही म्हणाला’ या कारणावरून पिंपरी-चिंचवड परिसरातील थेरगाव परिसरातील एका 20 वर्षीय तरूणाला या भागातील सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी बेदम मारहाण करण्याची घटना घडली होती. थेरगावातील गणेशनगर भागातील एका इमारतीच्या टेरेसवर सराईत गुन्हेगारांनी फिर्यादी तरूणाला बेदम मारहाण करण्याबरोबरच जमिनीवर पडलेली बिस्कीटे बळजबरीने खाण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना घडली होती.

या प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादीने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी प्रशांत आठवडे (शिवकालीन, गणेशनगर, थेरगाव), आदित्य काटे (ताथवडे) प्रकाश इंगोले या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा फरार आहे. अटकेतील तिघांचे टक्कल करून पोलिसांनी त्यांची धिंड काढली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड परिसरात चर्चेत आली आहे. पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

आरोपी रोहन वाघमारे याने फिर्यादी तरूणास 25 जानेवारीला शिवीगाळ करून भेटण्यास बोलवले. त्यानुसार फिर्यादी रात्री साडे अकराच्या सुमारास आरोपी रोहनला भेटला. यावेळी रोहन तु मला फोनवर शिवीगाळ का केली ? अशी विचारणा फिर्यादी तरूणाने करताच याचा आरोपी रोहन व त्याच्या साथीदारांना राग आला.

जबरदस्तीने जमिनीवर पडलेली बिस्किटे खाऊ घातली

तु मला रोहन का म्हणालास ? मला भाई का नाही म्हणाला ? मी या एरियाचा भाई आहे असे म्हणत फिर्यादीला शिवीगाळ करत बेल्ट व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी हा जखमी झाला. फिर्यादीला आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत जमीनीवर पडलेले बिस्कीटे बळजबरीने खाऊ घातले.

पोलिसांनी काढली आरोपींची धिंड

या प्रकरणानंतर फिर्यादीने वाकड पोलिस स्टेशनला संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर वाकड पोलिसांनी वेगाने तपास हाती घेत तिघांना बेड्या ठोकल्या. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन वाघमारे हा फरार आहे. अटकेतील आरोपींचे टक्कल करून वाकड पोलिसांनी रविवारी 30 रोजी घडलेल्या घटनेच्या परिसरातून धिंड काढली. आरोपींना तपासाकामी घटनास्थळी आणण्यात होते अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक डाॅ विवेक मुगळीकर यांनी दिली.