दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलणार ? शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी आणि बारावीच्या पूर्वनियोजित परीक्षा पुढे ढकलणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. (will Government postpone ssc hsc exams 2022) यावर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं, आम्ही पूर्णपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. 15 फेब्रुवारीपर्यंत परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, पुरवणी परीक्षा असते, कोविड परिस्थितीमुळे जे विद्यार्थी या परीक्षेला बसू शकले नाहीत त्यांना पुरवणी परीक्षेत बसवाव लागतं.

अशा एकावर एक अवलंबून गोष्टी असतात. त्यानंतर अकरावीचे प्रवेश असतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घेतला पाहिजे. आम्ही शैक्षणिक बोर्डासोबत चर्चा करत आहोत, अभ्यासक्रमाच्या संदर्भातही चर्चा करत आहोत. तसेच परीक्षा या नियमित वेळेनुसार आणि ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचंही यावेळी शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. 

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) बुधवार 4 मार्च 2022 पासून ते बुधवार 30 मार्च 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (लेखी) मंगळवार 15 मार्च 2022 पासून ते सोमवार 4 एप्रिल 2022 पर्यंत असणार आहे. बारावीच्या परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी mahahsc.in या लिंकवर क्लिक करा.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) साठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परीक्षा कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी व तोंडी/अंतर्गत गुणांच्या परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येतील.लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत होतील. तर माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान ऑनलाईन परीक्षांचा कालावधी 31 मार्च ते 9 एप्रिल 2022 असा असेल.

प्रात्यक्षिक, श्रेणी/ तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व आऊट ऑफ टर्न परीक्षा 31 मार्च ते 21 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येतील. इयत्ता बारावीच्या परीक्षांचा निकाल अंदाजे जून 2022 च्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल.