Organ Donation Form । अवयवदान, देहदानाचा फॉर्म भरायचा का ? कधी भरायचा ? कुठे भरायचा ? जाणून घेऊयात सविस्तर (www.notto.gov.in)

www.notto.gov.in । अवयवदान, देहदानाचा फॉर्म भरायचा का ? कधी भरायचा ? कुठे भरायचा? फाॅर्म भरला तर कोणती खबरदारी घ्यायची? याबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, त्याच प्रश्नांची उत्तरे सोप्प्या शब्दांत जाणुन घेऊयात या लेखात. ( Organ donation form where to fill, when to fill, why to fill )

अवयवदानाबद्दल एकदा प्रबोधन केलं की लोक म्हणतात आम्हाला फॉर्म भरायचा आहे.फॉर्म भरणे ही एक फॉरमॅलिटी आहे. याबाबत भरायचा ? नाही भरायचा ? असे दोन्ही प्रश्न येतात. अवयवदानाचे फॉर्म भरलेल्या १००० व्यक्तींमधील १० व्यक्तींपेक्षा ही कमी व्यक्तींचे प्रत्यक्ष वेळ आल्यावर दान घडते. हे प्रमाण खूप कमी आहे अथवा नगण्य आहे.असे का होते याचा विचार करणे आवश्यक आहे.

अवयवदाना बद्दल अथवा देहदानाबद्दल माझे उत्तम प्रबोधन झाले असेल तर मी फॉर्म भरण्याचा विचार करतो.परंतु प्रत्यक्ष ज्या वेळेला दान करण्याची वेळ येते त्यावेळेला माझा मृत्यू झालेला असतो. त्यामुळे मी कितीही चांगल्या भावनेने हा फॉर्म भरला असला तरी, माझे कुटुंबीय म्हणजे मृतदेहाचे वारसदार यांची भावना माझ्या इतकीच सकारात्मक नसेल तर त्यांच्याकडून प्रत्यक्ष दान घडत नाही. मग माझ्या फॉर्म भरण्याचा उपयोग काय ?

म्हणून मी फॉर्म भरणार असल्यास तो फॉर्म भरण्यापूर्वी माझ्या भावी-मृतदेहाचे वारसदार,  म्हणजेच माझे कुटुंबीय यांना मी त्याबाबत जागृत केले पाहिजे. त्यांचेकडे हट्टाग्रह केला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी माझी इच्छा पूर्ण केलीच पाहिजे हे त्यांना बजावून सांगितले पाहिजे.

माझी जेवढी प्रामाणिक भावना आहे, तेवढीच प्रामाणिक भावना व इच्छा माझे कुटुंबीय वारसदार यांच्या मनात निर्माण करण्याची जबाबदारी माझी आहे. ती मी जर पार पाडू शकत असेन तरच मी भरलेल्या फॉर्मला काहीतरी अर्थ आहे. अन्यथा माझा फॉर्म भरणे हे फक्त अरण्यरुदन ठरते उपयोग काहीच नाही.

माझ्या कुटुंबीयांना मी हे ही बजावून सांगितले पाहिजे की ही दानाची प्रक्रिया उपलब्ध असलेल्या वेळेच्या मर्यादेतच होणे आवश्यक आहे.नेत्रदान, त्वचादान व देहदाना बाबत ही मर्यादा सहा तासाची आहे. प्रत्यक्ष मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत नेत्रदान, त्वचादान व त्यानंतर देहदान घडणे आवश्यक आहे.

त्यामुळे मृत्यूसमयी माझे जवळ माझ्या कुटुंबियांपैकी सर्वजण हजर नसतील व बाकीचे कुटुंबीय वेळे मध्ये हजर होऊ शकणार नसतील, तरीही हजर असणाऱ्या व्यक्तीने ही प्रक्रिया धीराने व वेगाने पार पाडली पाहिजे हे मी निक्षून सांगणे आवश्यक आहे.

मृत्यूनंतर दर्शनासाठी अथवा कोणत्याही कारणासाठी कुणीही नातेवाईक येण्याची वाट पाहणे याबाबत कुटुंबीय आग्रही असल्यास  दान होऊ शकत नाही.म्हणूनच माझे कुटुंबीय अर्थात माझ्या मृतदेहाचे वारसदार यांना सर्व तऱ्हेने समजावून सांगून या कृतीला त्यांची निश्चित संमती मिळवणे ही माझी जबाबदारी असली पाहिजे.

जेव्हा सर्व कुटुंबीय एक मताने निसंदिग्ध पणे या गोष्टीला तयार असतील तर आणि फक्त तरच मी फॉर्म भरावा अन्यथा फार्म भरण्याची फॉर्मॅलिटी करण्याची आवश्यकता नाही.

जर माझे कुटुंबीय मला हवे असलेल्या प्रामाणिक भावनेने तयार  असतील तर मी फॉर्म नाही भरला तरीही ते दान करू शकतात.मग फार्म भरण्याची काय आवश्यकता आहे ? हाही प्रश्न ओघाने येतोच.

नोटो – रोटो – सोटो या सरकारी संस्थांमार्फत फॉर्म भरता येतो. पण अनेक स्वयंसेवी संस्था सुद्धा फॉर्म भरून घेतात. या भरून गेलेल्या फॉर्मचे पुढे काय होते ? तर काहीच नाही.ते त्या संस्थेच्या रेकॉर्डमध्ये काही जागा अडवतात एवढेच.

प्रत्यक्ष फॉर्म भरल्यानंतर आपल्याला डोनर कार्ड मिळते.हे डोनर कार्ड आपल्याजवळ सतत बाळगणे गरजेचे असते. आपल्या कोणत्याही सार्वजनिक वा कौटुंबिक कार्यक्रमात आपली मित्रमंडळी आपले नातेवाईक यांना ते कार्ड अभिमानाने दाखवावे जेणेकरून त्यांचेही प्रबोधन व्हावे अथवा याबाबत जाणून घेण्याची त्यांना इच्छा होईल असे पहावे.

माझा जर अपघाती मृत्यू झाला असेल तर डॉक्टरांना हे डोनर कार्ड खिशात सापडल्यास त्यामध्ये माझ्या कुटुंबीयांचा फोन नंबर मिळेल तसेच अशा दुःखद प्रसंगी हा विषय माझ्या कुटुंबियांसमवेत काढणे हे डॉक्टरांना अवघड जाते. पण ते कार्ड दाखवून माझ्या कुटुंबीयांना याबाबतची आठवण करून देणे अथवा विचारणा करणे सोपे जाते.

म्हणजे खरा उपयोग फॉर्मचा नसून डोनर कार्डचा असतो. म्हणून काही संस्था फॉर्म भरून न घेता फक्त डोनर कार्डचेच वाटप करतात व त्यावर आपण आपली माहिती भरून ते सतत जवळ बाळगायचे असते.

परंतु अवयवदानासाठी नोटो www.notto.gov.in या सरकारी संस्थेचा ऑनलाइन फॉर्म भरल्यास त्या संस्थेचे कार्ड मला माझ्या ईमेलवर त्वरित उपलब्ध होऊ शकते.त्याची प्रिंट काढून आणि हौसेने लॅमिनेट करून ते सतत माझ्या जवळ बाळगू शकतो.

तसेच या सरकारी कार्डवर एक क्रमांक येतो. हा डोनर क्रमांक आतापर्यंत किती लोकांनी सरकारी फॉर्म भरले आहेत हे दर्शवितो. त्यामुळे सरकारला किती लोकांचे प्रबोधन झाले आहे याचा अंदाज येऊन समाज प्रबोधनाबाबतच्या प्रगतीचा ही अंदाज येतो.

देहदानाचा फॉर्म आपल्या जवळपासच्या मेडिकल कॉलेजमधील शरीरशास्त्र विभागात उपलब्ध असतो. तेथून तो फॉर्म घेऊन तो फॉर्म भरून देऊन त्यांचेकडून डोनर कार्ड अथवा फॉर्म भरल्याची पोहोच मिळू शकते.

मृत्यूनंतर देहदान करणाऱ्या कुटुंबियांना मेडिकल कॉलेजमध्ये ते कार्ड दाखवल्यास सर्व  फॉर्मॅलिटी म्हणजेच आवश्यक ती कागदपत्रे लवकर होऊ शकतात. काही मेडिकल कॉलेजेसनी त्यांच्या वेबसाईटवर ऑनलाइन देहदानाचा फॉर्म भरण्याची सोय केलेली आहे.

आपण फॉर्म भरला किंवा नाही भरला, तरी आपली प्रामाणिक इच्छा आणि दानाची कळकळ आपल्या कुटुंबियांपर्यंत आपण योग्य तऱ्हेने पोहोचविल्यास अवयवदान व देहदानाची संख्या निश्चितपणे वाढू शकेल. फॉर्म भरण्यापूर्वी कुटुंबियांशी संवाद साधा. कुटुंबियांशी चर्चा करा.आणि कुटुंबीयांना तुमची इच्छा आणि कळकळ समजेल असे पहा.असे घडल्यास जेवढे फॉर्म तेवढी दाने घडू शकतील.

( सुचना :  सदरील लेख  डॉ.संजीव लिंगवत, अध्यक्ष, जनसेवा प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (संपर्क: 9421268268) यांच्या फेसबुकवरुन घेण्यात आलेला आहे. काही शंका असतील तर डॉ.संजीव लिंगवत सरांशी थेट संपर्क करावा अथवा सुनील देशपांडे (९६५७७०९६४०) सरांशी संपर्क साधून अधिक माहिती घ्यावी.)