महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीचा हाय होल्टेज ड्रामा, मतमोजणी थांबली, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले लक्ष

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी अतिशय चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. या निवडणुकीत 288 पैकी 286 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते.मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. ( High voltage drama of Rajya Sabha elections in Maharashtra, counting of Rajya Sabha votes stopped, attention was drawn to the decision of Central Election Commission )

मतदान संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती, मात्र अजूनही महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठीची मतमोजणी सुरू झालेली नाही. भाजप आणि महा विकास आघाडीने घेतलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणी लांबणीवर पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी तक्रारी केल्या आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र आता भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण जोरदार तापले आहे.

दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचे व्हिडिओ फुटेज मागवले आहेत. त्यानंतरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतमोजणी संदर्भातील निर्णय होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतमोजणीला परवानगी दिल्यास अवघ्या तासाभरात निकाल समोर येतील, मात्र सध्या तरी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक सुरू असून निर्णय कधी येतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

भाजपचा आक्षेप

राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमतीताई ठाकूर, तर शिवसेनेचे आमदार सुहास कायंदे अशा महा विकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेतला आहे,तिघांंची मते बाद करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली, मात्र पीठासीन अधिकारी यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे.

महाविकास आघाडीचा आक्षेप

तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. आमदार अमर राजूरकर यांच्या मते मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे आणि ॲड. अशिष शेलार यांना दिल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच आमदार रवी राणा यांच्या मतावर महाविकास आघाडीने आक्षेप घेेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे लागले लक्ष

एकूणच भाजप आणि महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परस्परविरोधी तक्रारी  दाखल झाल्याने राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी रखडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. त्यानंतरच महाराष्ट्रातील खरे चित्र स्पष्ट होईल.