जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान होऊन सात तासांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभेच्या मतमोजणी संदर्भात निर्णय न दिल्याने शिवसेना नेते संजय राऊत संतप्त झाले आहेत. या सर्व प्रकरणावरून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य करत जोरदार निशाणा साधला आहे. (How long will the comedy of democracy continue ?Sanjay Raut’s serious allegations against BJP)
संजय राऊत यांनी ट्विट करत भाजप वर गंभीर आरोप केले आहेत. राऊत यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, भारतीय जनता पक्षाने देशातील लोकशाही, न्यायव्यवस्था, केंद्रीय तपास यंत्रणा आणि निवडणुक आयोगास देखील पकडीत घेतले आहे. महाराष्ट्रात तीन मतांबाबत निर्णय घ्यायला 7 तास लागतात? कमाल आहे. लोकशाहीची हास्य जत्रा किती काळ चालू ठेवणार? असा सवाल करत जिंकणार तर महा विकास आघाडीच.. जय महाराष्ट्र असे म्हणत राऊत यांनी भाजपचा जोरदार समाचार घेतला.
महाराष्ट्रात आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी अतिशय चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. या निवडणुकीत 288 पैकी 286 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे.
मतदान संपल्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती, मात्र अजूनही महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठीची मतमोजणी सुरू झालेली नाही. भाजप आणि महा विकास आघाडीने घेतलेल्या आक्षेपांमुळे मतमोजणी लांबणीवर पडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी तक्रारी केल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय देणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे, मात्र आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप विरोधात गंभीर आरोप करण्यास सुरुवात केल्याने महाराष्ट्राचे राजकीय वातावरण जोरदार तापले आहे. भाजपा केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यसभेच्या मतदानानंतर नेमकं काय घडलं ?
राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या मंत्री यशोमतीताई ठाकूर, तर शिवसेनेचे आमदार सुहास कायंदे अशा महा विकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेतला आहे,तिघांंची मते बाद करण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली, मात्र पीठासीन अधिकारी यांनी भाजपची ही मागणी फेटाळून लावली त्यानंतर भाजपने थेट केंद्रीय निवडणूक आयोगाकडे यासंबंधीची तक्रार दाखल केली आहे.
तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार अमर राजूरकर यांनी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मतावर आक्षेप घेतला आहे. आमदार अमर राजूरकर यांच्या मते मुनगंटीवार यांनी आपली मतपत्रिका चंद्रशेखर बावनकुळे आणि ॲड. अशिष शेलार यांना दिल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच आमदार रवी राणा यांच्या मतावर महाविकास आघाडीने आक्षेप घेेत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
संजय राऊत यांचा भाजप वर गंभीर आरोप
एकूणच भाजप आणि महाविकास आघाडीकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी रखडली आहे. तक्रारी करून सात तासांपेक्षा अधिक काळ लोटला तरी, अजूनही केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणी संदर्भात कुठलाच ठोस निर्णय न घेतल्याने महाविकास आघाडीचे नेते संतप्त झाले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याची टीका करत, काहीही झाले तरी महाविकास आघाडीचाच विजय होणार, असा इरादा ट्विटवरून बोलून दाखवला आहे.