नाशिक पदवीधर निवडणूक : सत्यजीत तांबे यांच्या अडचणीत वाढ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली मोठी घोषणा

मुंबई: युवक काँग्रेसचे नेते सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्व पूर्वनियोजित आहे. सुधीर तांबे यांनी काँग्रेस पक्षाशी दगाफटका केला आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत गुरुवारी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे हे नाशिकला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते. मात्र, ऐनवेळी सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात एकच खळबळ उडाली होती.

यासंदर्भात बोलताना नाना पटोले यांनी काँग्रेस पक्ष सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार नाही, असे स्पष्ट केले. आम्ही सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत.आम्ही काल रात्री संपूर्ण अहवाल हायकमांडला पाठवला आहे. आज हायकमांड निर्देश देईल त्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेऊ. पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

सुधीर तांबे यांनी फॉर्म न भरता पक्षासोबत फसवेगिरी केली आहे. त्यांनी आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरायला लावला. त्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले की, आम्ही भाजपचा पाठिंबा घेणार आहोत. हा काँग्रेस पक्षाशी दगाफटका असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.

सत्यजीत तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज भरून भाजपचा पाठिंबा मागणे, हे सर्वकाही पूर्वनियोजित होते. या भागातील पदवीधर लोक अडाणी नाहीत. भाजपकडून लोकांना भय दाखवून घरे फोडण्याचे काम सुरु आहे. आज भाजपला या सगळ्याचा आनंद वाटत आहे. भाजपच्या प्रमुखांची वक्तव्ये पाहता त्यांना या सगळ्याचा आनंद वाटतोय. पण एक दिवस भाजपचे घर फुटेल तेव्हा त्यांना दु:ख कळेल, असे नाना पटोले यांनी म्हटले.

सत्यजीत तांबे यांच्या निर्णयामुळे पक्षीय पातळीवर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. केंद्रातही वजन असलेल्या थोरात यांना पक्षातील आणि त्यांच्याच मतदारसंघातील आणि तेही नातेवाईक असलेल्या कार्यकर्त्यांनी धक्का दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बाळासाहेब थोरात यांना या सगळ्याची अगोदरच कुणकुण लागली होती. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांनी भाजपच्या एका बड्या नेत्याला फोन करुन सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देऊ नका आणि त्यांना पक्षातही घेऊ नका, असे सांगितल्याची माहिती समोर येत आहे.