अखेर बीडकरांचे स्वप्न पुर्ण, बहुचर्चित आष्टी ते अहमदनगर रेल्वेमार्गाचा थाटात लोकार्पण सोहळा संपन्न, ज्या ज्या नेत्यांनी संघर्ष केला त्यांनाच याचं श्रेय – पंकजा मुंडे
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । Ashti – Ahmednagar railway news today | बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते. हे आश्वासन आज पूर्ण झाले. तब्बल सत्तर वर्ष ज्या क्षणाची बीड जिल्हा वाट पाहत होता, ते स्वप्न आज पुर्ण झाले. या रेल्वे मार्गाला दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नाव द्यावे अशी मागणी करत आहेत, मात्र अशी मागणी मी करणार नाही, अशी मोठी घोषणा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना केली.
बहुचर्चित आष्टी – अहमदनगर रेल्वे आजपासून जनतेच्या सेवेत दाखल झाली. बीड जिल्ह्याच्या विकासाची नवी पायवाट आजपासून सुरू झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवला तर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आष्टी – अहमदनगर रेल्वे मार्गाचे लोकार्पण केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, आमदार बाळासाहेब आजबे सह आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा रेल्वे मार्ग रेल्वे विभागासाठी फायद्याचा नाही. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठिंब्यामुळे हा रेल्वे मार्ग जनतेच्या सेवेसाठी तयार करण्यात आला. बीडच्या स्वाभिमानी माणसासाठी हा रेल्वेमार्ग भेट आहे. हा रेल्वे मार्ग मुंबई ते परळीपर्यंत व्हावा, अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली. ही रेल्वे धावण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी संघर्ष केला, त्यांनाच याचं श्रेय जातं, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं.
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरली आहे. त्यांनी ही रेल्वे धावण्यासाठी खूप कष्ट घेतले असतील तरीही त्यांचं नाव या रेल्वेला देण्याची मागणी मी करणार नाही, कारण त्यांना ते आवडणार नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी यावेळी केलं. मराठवाड्यातील शेतकरी, विद्यार्थी आणि उद्योजक वर्गाच्या दृष्टीने ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. लवकरच बीड ते मुंबई असा टप्पा रेल्वेने पूर्ण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अहमदनगर ते न्यू आष्टी डेमू ट्रेनचे वेळापत्रक (Ahmednagar – Ashti railway time table)
अहमदनगर ते आष्टी ही डेमू ट्रेन नगरहून सकाळी 07 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि आष्टी येथे सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी पोहचेल. दुसरीकडे ही रेल्वे सकाळी 11 वाजता आष्टीवरून सुटून दुपारी 1 वाजून 55 मिनिटांनी नगरला पोहोचेल. रविवार वगळता दररोज ही रेल्वे सेवा सुरु राहणार आहे. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह या स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे.