जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महसूल, कृषी व ग्रामविकास या विभागांनी समन्वयाने कामकाज करत अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राचे ३० सप्टेंबरपर्यंत शंभर टक्के पंचनामे पूर्ण करावेत. त्याचबरोबर अवैध वाळू उपसा, खडी क्रशर ही शंभर टक्के बंद झाली पाहिजे. अशा सक्त सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याबाबतची आढावा बैठक महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज प्रवरानगर येथे घेण्यात आली. यावेळी उपस्थित महसूल, ग्रामविकास, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
बैठकीला शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, संगमनेर उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरूळे, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोले, तहसीलदार कुंदन हिरे, अमोल निकम, प्रशांत पाटील, फसियोद्दीन शेख, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, अनिल नागणे आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री विखे पाटील म्हणाले, तूर्तास ई-पीक पाहणीच्या कामापेक्षा पीक पंचनाम्याच्या कामांना प्राधान्य दिले पाहिजे. शेतकऱ्यांना संकटातून दिलासा देण्यासाठी अधिकारी – कर्मचाऱ्यांनी सकारात्मक राहून कामकाज केले पाहिजे. अनधिकृत वाळू उपसा, खडी क्रशर बाबत कठोर भूमिका घेत कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दोषींवर गुन्हे दाखल करा. असे निर्देश महसूलमंत्र्यांनी महसूल यंत्रणेला दिले.
फळबागांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम कृषी विभागाने करावे. असा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी राहाता, संगमनेर, श्रीरामपूर व राहूरी च्या तहसीलदारांनी पीक पंचनाम्याच्या प्रगतीविषयी माहिती सांगितली. राहाता तालुक्यात साडेआठ हजार हेक्टर क्षेत्राचे ११३७६ पंचनामे झाले आहेत. अशी माहिती तहसीलदार कुंदन हिरे यांनी यावेळी दिली.
बैठकीला मार्गदर्शन करण्यापूर्वी तलाठी, ग्रामसेवक व महसूल अधिकारी- कर्मचाऱ्यांना पंचनामे करतांना उद्भवणाऱ्या अडचणी महसूलमंत्र्यांनी जाणून घेतल्या.