देवेंद्र फडणवीसांचे आष्टीकरांना मोठे गिफ्ट : धस साहेब काळजी करू नका, रावसाहेब, तुमची तर गाडी जोरात धावतेय, तुमच्या गाडीला आमच्या..
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । “कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा फायदा आष्टी तालुक्यापर्यंत होणार आहे. या प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी आमदार सुरेश धस यांनी मागणी केली आहे. धस साहेब काळजी करू नका, आपलं सरकार आलयं, आता द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये मौजे शिंपोरा ते खुंटेफळ थेट पाईपलाईन या कामाचा समावेश केला जाईल, या प्रकल्पाला कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.”
आष्टी ते अहमदनगर या रेल्वे प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा आज आष्टीत पार पडला. या सोहळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जे पाणी समुद्रात वाहून जातं, ते पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचे काम आम्ही करत आहोत, हे पाणी मराठवाड्यासाठी असणार आहे. यामुळे कुठेही दुष्काळ राहणार नाही, पाण्याचा वाद राहणार नाही, मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याचं काम या योजनेतून होईल,” असे सांगत फडणवीस यांनी मराठवाड्यातील जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न केला.
रेल्वेकरिता सर्वात जास्त पुढाकार मुंडे साहेबांनी घेतला
फडणवीस पुढे म्हणाले, आज मोठा आनंदाचा क्षण आहे, मोठ्या संघर्षानंतर बीड जिल्ह्यातून रेल्वे धावत आहे. पंकजाताईंनी उल्लेख केला की, विलासरावजी असतील, केशरकाकु असतील, रेल्वे संघर्ष समिती असेल पण याहीपेक्षा या रेल्वेकरिता सर्वात जास्त पुढाकार जर कोणी घेतला असेल तर ते आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांनी घेतला.
दर तीन महिन्यांनी प्रकल्पाचा आढावा घ्यायचो
फडणवीस पुढे म्हणाले की, मुंडे साहेबांना खरी श्रध्दांजली जर द्यायची असेल तर अहमदनगर- बीड – परळी ही रेल्वे धावली पाहिजे. यासाठी मागील पाच वर्षापुर्वी आपलं सरकार येताच हा प्रकल्प हाती घेतला. पाच वर्षांत दर तीन महिन्यांनी या प्रकल्पाचा मी आढावा घ्यायचो, पंकजाताई आणि प्रितमताई सोबत होत्या असे फडणवीस म्हणाले.
अहमदनगर- बीड- परळी या रेल्वेप्रकल्पासाठी अत्तापर्यंत 2 हजार कोटींचा निधी केंद्र सरकारने दिला आहे. त्यातील 1800 कोटींचा निधी एकट्या नरेंद्र मोदी सरकारने दिला आहे. राज्यसरकारने 1400 कोटी दिले आहेत. त्यात 1200 कोटी मागच्या पाच वर्षांत भाजप सरकारने दिले आहेत. असे फडणवीस म्हणाले.
बीड रेल्वेसाठी 250 कोटीचा निधी
महाविकास आघाडी सरकारने 50 -50 टक्के शेअरिंग करणार नाही, असा निर्णय घेतला त्यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्प मागे पडले होते. परंतू आपलं सरकार सत्तेवर येताच 50 % शेअरिंग पुन्हा सुरू केलं, या वर्षाकरिता बीड रेल्वेसाठी 250 कोटीचा निधी दिला आहे. आज अर्धे स्वप्न पुर्ण होत आहे, हे खरं आहे, ज्या दिवशी ही रेल्वे परळीपर्यंत जाईल, त्याच दिवशी मराठवाड्यातील जनतेचं आणि स्व गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पुर्ण होईल असेही फडणवीस म्हणाले.
रावसाहेब, तुमची तर गाडी जोरात धावतीय…
रावसाहेब, तुमची तर गाडी जोरात धावतीय, तुमच्या गाडीला आमच्या सरकारचं डबल इंजिन लावतो आहोत, आता ही गाडी थांबणार नाही, स्वप्न पुर्ण झाल्याशिवाय ही गाडी थांबणार नाही, असे सांगत खासदार प्रितम मुंडे यांनी रेल्वेसाठी सातत्याने पाठपुरावा केला याबद्दल फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले.