Maharashtra Health Department Exam new dates | आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार ? आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केली तारखांची घोषणा !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Maharashtra Health Department Exam new dates | महाराष्ट्र आरोग्य विभागानं स्थगित केलेल्या पदभरतीच्या परीक्षेमुळे राज्यात गोंधळाचे वातावरण आहे.राज्यात नव्याने आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार ? या प्रश्नाचे उत्तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले असुन परिक्षेच्या नव्या तारखा त्यांनी घोषित केल्या आहेत.

आरोग्य विभागाची ही परीक्षा येत्या 15-16 ऑक्टोबर किंवा 22-23ऑक्टोबरला (Dates for health department exams) होईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊन विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाणार आहे.

महाराष्ट्राच्या आरोग्य विभागामार्फत घेतली जाणारी गट क आणि गट ड पदाची परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ही परीक्षा ऐनवेळी रद्द करण्यात आल्याची घोषणा आदल्या दिवशी करण्यात आली. यामुळे राज्यातील मोठा गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांनी मोठा संताप व्यक्त केला होता. तर राजकीय वर्तुळातून मोठी टिका झाली आहे. पद भरतीत आर्थिक व्यवहार झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.

परिक्षा रद्द होण्याची  घोषणा होण्यापूर्वीच अनेक विद्यार्थी घरातून बाहेर पडले होते, काही विद्यार्थी पोहोचले होते तर काहीजण प्रवासात होते. आयत्या वेळी परीक्षा रद्द करण्याची घोषणा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. अनेकांच्या वेळेचं आणि पैशांचंही नुकसान झालं होतं. त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत लवकरच नवी तारीख जाहीर करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. तसेच आरोग्य मंत्र्यांनी माफीही मागितली होती.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परिक्षा कधी होणार यावर बोलताना दोन वेगवेगळ्या तारखांची शक्यता व्यक्त केली आहेत. 15 आणि 16 तारखेला रेल्वेची पूर्वनियोजित परीक्षा आहे. ही परीक्षा पुढे ढकलून आरोग्य विभागाची परीक्षा प्राधान्याने घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे पुन्हा या परीक्षेची तारीख जर-तर वर अवलंबून असल्याचं चित्र आहे.

जर रेल्वेची परीक्षा पुढे ढकलता आली, तर 15-16 तारखेला आरोग्य विभागाची परीक्षा होईल. जर रेल्वेची परीक्षा पुढं ढकलणं शक्य झालं नाही, तर मात्र 22-23 तारखेला परीक्षा घेतली जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

ही परीक्षा घेण्याचं काम सरकारनं न्यासा (NYSA) कंपनीला दिलं आहे. मात्र या कंपनीचा पूर्वइतिहास वादग्रस्त आहे. पंजाबमधील ढिसाळ कामगिरीबद्दल या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयानं या कंपनीला ब्लॅकलिस्टमधून बाहेर काढलं. यापूर्वी अनेक घोळ घातलेल्या या कंपनीला महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विभागाच्या परीक्षांचं काम दिलं होतं. शिवाय त्यातील गोंधळाबद्दल यापूर्वी कुठलीही कारवाई केली नव्हती. त्याचा नाहक ताप वारंवार विद्यार्थ्यांना सहन करावा लागला होता.

 

web title: Maharashtra Health Department Exam new dates