Shocking news | धक्कादायक : अल्पवयीन मुलीचे स्मशानभूमीत पूजन ; मांडीवर कोंबडा ठेऊन मांत्रिकाने केले पूजन:व्हिडीओ वायरल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Shocking News | राज्यात अंधश्रध्दा विरोधी कायदा अस्तित्वात आला खरा पण राज्यात अंधश्रध्देच्या घटना रोज घडत आहेत. बुवाबाजीतून केले जाणारे अनेक अघोरी प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक अघोरी प्रकार आता समोर आला आहे.(Worship of a minor girl at a cemetery in Satara district)

अल्पवयीन मुलीला स्मशान भूमीत पुजण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्मशान भूमीच्या कट्ट्यावर मुलीच्या मांडीवर कोंबडा देऊन मांत्रिकाने पूजन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.सातारा जिल्ह्यातील सुरुरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे.

अल्पवयीन मुलीला स्मशानभूमीच्या कट्ट्यावर बसवून तिच्या मांडीवर कोंबडा ठेवण्यात आला होता. मांत्रिकाने पूजन करतानाचा हा प्रकार युवकांच्या निदर्शनास येताच मांत्रिकासह अल्पवयीन मुलगी, नातेवाईक परागंदा झाले. चक्क स्मशान भूमीत अशा प्रकारे अल्पवयीन मुलीचे पूजन केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील सुरूर गावाच्या स्मशानभूमीत ही घटना घडली.

अंधश्रध्दा निर्मूलन समितीने या व्हिडीओची दखल घेतली आहे. अंनिसचे डाॅ हमीद दाभोळकर यांनी याप्रकरणी एक व्हिडीओ जारी करत कारवाईची मागणी केली आहे. सदर घटनेत नरबळीची शक्यता नाकारता येत नाही अशीही भीती दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे.

साताऱ्यातील सुरूर येथील स्मशानभूमीत सुरू असलेल्या अंधश्रध्देच्या अघोरी प्रकाराचा पर्दाफाश गावातील युवकांनी केला. युवकांनी व्हिडिओ वायरल केल्याने हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. स्मशान भूमीत अघोरी प्रकार करणारे परांगदा झाले आहेत. या गंभीर प्रकरणात प्रशासनाने वेळीच संबंधितांना शोधून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे.