Khushal Rasiklal Tamka | मुंबईत 8 कोटींच्या सोन्याची चोरी, चोरट्यांचा 700 किलोमीटरचा थरारक सिनेस्टाईल पाठलाग, पुढे काय घडलं ? वाचा सविस्तर

मुंबई : Khushal Rasiklal Tamka । राजस्थानच्या घनदाट जंगलात कडाक्याच्या थंडीत एल. टी. मार्ग पोलिसांनी सिनेमात शोभेल अशी जबरदस्त कामगिरी पार पाडली. भुलेश्वर येथील खुशाल रसिकलाल टामका सराफाच्या कार्यालयातील आठ कोटी 19 लाखांचे सोने चोरून पसार झालेल्या मुख्य आरोपीसह दहा जणांना अक्षरशः शेकडो किमी पाठलाग करून पकडले.

या थरारक कारवाईमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिस दलाची यशस्वी कारवाई चर्चेत आली आहे.आरोपींकडून तब्बल सात कोटी 12 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

14 जानेवारीला खुशाल रसिकलाल टामका  (Khushal Rasiklal Tamka) या सराफाच्या कार्यालयात काम करणाऱ्या गणेश कुमार (21) (Ganesh kumar) याने त्याच्या अन्य चार साथीदारांच्या मदतीने टामका यांचे सव्वाआठ कोटींचे सोन्याचे दागिने आणि साडेआठ लाखांची रोकड असा मुद्देमाल चोरून नेला होता.

याप्रकरणी टामका यांनी तक्रार दाखल केल्यानंतर एल. टी. मार्ग पोलिसांनी (LT Marg police) गुन्ह्याचा तपास सुरू केला. एसीपी समीर शेख, वरिष्ठ निरीक्षक ज्योती देसाई, निरीक्षक ओम वंगाटे यांच्या नेतृत्वाखाली आठ पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. अथक परिश्रम व शिताफीने तपास करीत दहा आरोपींना अटक करून जवळपास 90 टक्के मुद्देमाल जप्त केल्याचे सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील (Vishwash Nangare Patil) यांनी सांगितले.

ओलाने बोरिवली… पुढे इनोव्हाने राजस्थान

त्या दिवशी गणेश याने त्याचा साथीदार रमेश प्रजापती यांच्या मदतीने दागिने चोरले तर कैलास भाट त्यावेळी कार्यालयाखाली उभा राहिला आणि अन्य दोघे वॉच करत उभे होते. चोरी केल्यानंतर पाचही जण ओलाने बोरिवलीला गेले. तेथून इनोव्हा कारने राजस्थान गाठले. इनोव्हात बसण्याआधी आरोपींनी तेथील बसचालकाकडे राजस्थानला जाण्याबाबत विचारपूस करायचे नाटक देखील केले.

राजस्थानच्या जंगल परिसर असलेल्या दिसापूर येथे त्यांनी इनोव्हा सोडली आणि दुसऱ्या गाडीने ते गिरावल येथे गेले. तेथील एका गोशाळेतल्या धान्याच्या खोलीत बसून सोन्याच्या दागिन्यांचे वाटप करून वेगवेगळ्या दिशेने पसार झाले. मुंबईहून सिरोही तालुक्यात जाईपर्यंत सर्वांनी मोबाईल बंद ठेवले, पण इनोव्हा कारचालकाचा मोबाईल सुरू होता आणि तोच पोलिसांच्या पथ्यावर पडला.

घनदाट जंगलात 700 किमी पाठलाग

गणेश, कैलास आणि किसन या तिघांचे लोकेशन पोलिसांना मिळू लागले. त्यानुसार पोलिसांच्या पथकांनी तिघांचा पाठलाग सुरू केला. सिनेमात शोभेल असा चोर-पोलिसांचा पाठलाग सिरोहीच्या जंगलात झाला. आरोपी नेमके कुठल्या वाहनातून पळताहेत हे समजत नव्हते, पण लोकेशननुसार पोलिसांची भागम्भाग सुरू होती.

अखेर 700 किमीचा पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी गणेश, कैलास या दोघांना सिरोही येथे पकडले. तेव्हा समजले की तिघे पोलिसांना चकवा देण्यासाठी दुचाकीवरून पळत होते. किसनला मध्य प्रदेशातील राजपूर गावात सापडला.

त्यानंतर या आरोपींना आश्रय देणारे श्यामलाल सोनी, विक्रमकुमार मेघवाल आणि उत्तम पन्नालाल अशा तिघांना पकडले. अशा प्रकारे राजस्थान आणि मध्य प्रदेशात सलग 12 दिवस अथक परिश्रम करून एल. टी. मार्ग पोलिसांनी दहा जणांना पकडले आणि सात कोटी 12 लाखांचे दागिने हस्तगत केले.

चालकाच्या नंबरवरून तपासाची दिशा

गुन्हा केल्यापासून आरोपींनी मोबाईल नंबर बंद केले, पण इनोव्हा चालकाच्या मोबाईल नंबरवरून पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपींच्या मागोमाग एसीपी शेख आणि ओम वंगाटे हे सहा पथकांसह राजस्थानात पोहचले. सिरोहीच्या रेवदर बस स्थानकात रमेश प्रजापती पोलिसांच्या हाती लागला.

रमेशने हायवेलगत असलेल्या गहूच्या शेतात दोन वेगवेगळ्या ठिकाणी गणेश आणि त्याच्या वाटय़ाला आलेले नऊ किलो 70 ग्रॅम सोन्याचे दागिने खड्डा खणून त्यात लपवले होते. ते खड्डे उकरून पोलिसांनी दागिने हस्तगत केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने हिंमतसिंह, प्रल्हादसिंह आणि लोकेंदर यांच्याकडे ठेवल्याचे कळताच एका पथकाने या तिघांना पकडले. त्यांच्याकडून 66 लाख 70 हजार किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले.