मोठी बातमी : सिताराम कुंटेंचा ईडीसमोर धक्कादायक गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या.

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) ईडीच्या (ED) अटकेत आहे. देशमुख यांना अजूनही जामीन मिळालेला नाही. सध्या त्यांचा मुक्काम आर्थर रोड तुरूंगात आहे. आता त्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलिसांच्या बदल्यांसंदर्भात त्यांनी धक्कादायक दावा केला आहे.

मुख्य सचिव म्हणून गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सिताराम कुंटे निवृत्त झाले आहेत. यानंतर त्यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकारी मानले जातात. आता त्यांनीच ईडीसमोर नोंदवलेल्या जबाबात देशमुखांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशमुखांवरील शंभर कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांबाबत ईडीने अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले होते. यात कुंटे यांचाही जबाब नोंदवला होता.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात देशमुख माझ्याकडे अनधिकृत याद्या पाठवत होते, असा खळबळजनक दावा कुंटेंनी ईडीसमोर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, देशमुख गृहमंत्री असताना पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी याद्या पाठवायचे.

यावर कुठल्या अधिकाऱ्याची कुठे बदली करायची याचा उल्लेख असायचा. देशमुखांचा स्वीय सहाय्यक संजीव पालांडे हा याद्या पोचवायचा. देशमुख हे गृहमंत्री असल्याने मी यासाठी नकार देऊ शकत नव्हतो. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार मी बदल्या करीत होतो असा गौप्यस्फोट कुंटे यांनी केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर सचिन वाझेमार्फत 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर अनिल देशमुखांना गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरला अटक केली होती. या प्रकरणी देशमुख सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.