पहिल्या जामखेड भूषण पुरस्काराची घोषणा, पिंपळगावचे डाॅ काकासाहेब मोहिते ठरले पुरस्काराचे मानकरी !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेड येथिल दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा जामखेड भूषण पुरस्कार शिरुर येथील सी.टी बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहिते यांना जाहीर करण्यात आला आहे दि. २४ मे रोजी जामखेड येथे सदर पुरस्काराचे वितरण शिक्षणतज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थेचे सेक्रेटरी शशिकांत देशमुख यांनी दिली.

जामखेड येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेने यावर्षीपासून जामखेड भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. जामखेड तालुक्यातील शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, उद्योग, साहित्य, किडा व सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस हा पुरस्कार देण्यात येणार असून सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

२०२२ या वर्षीचा पहिला जामखेड भूषण पुरस्कार जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील रहिवासी व शिरुर येथील सी. टी. बोरा कॉलेजचे प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते यांना जाहिर करण्यात आला असून संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केलेली आहे.

कोण आहेत काकासाहेब मोहिते ?

डॉ काकासाहेब मोहिते हे भौतिकशास्त्र हा विषय पदवी व पदव्युत्तर स्तरावर शिकवत असून अपारंपारिक उर्जा या विषयामध्ये त्यांनी उल्लेखनीय संशोधन केलेले आहे. त्यांचे आजवर शंभरहून अधिक शोधनिबंध राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंबलबजावणीसाठी राज्य शासनाने स्थापन केलेले राज्यस्तरीय समितीच्या सदस्यपदीही त्यांची नुकतीच नेमणूक करण्यात आलेली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, अधिसभा सदस्य, विद्वतसभा सदस्य, विज्ञान शाखा अधिष्ठाता, दुबई येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राचे संस्थापक संचालक आविष्कार या उपक्रमाचे प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनिय काम केलेले आहे. अमेरिकेतील एस. पी. आय. ई. यांच्या वतीने संशोधन पुरस्कार, इंडियन फिजिक्स असोसिएशनचा सी. व्ही. रामन उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, तंत्रशिक्षण, अपारंपारिक उर्जा व लहान व मध्यम उद्योग या तीन मंत्रालयांच्या वतीने संयुक्तपणे देण्यात येणारा एक्सलन्स इन एज्युकेशन आदि पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.तसेच त्यांच्या नावावर अपारंपारिक उर्जा क्षेत्रतील तीन पेटेंटही नोंदविण्यात आलेले आहेत.

पुरस्कार देण्यामागची भूमिका काय ?

जामखेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देवून त्यांच्या संशोधनाचा ज्ञानाचा संस्था व तालुक्याला निश्चित चांगल्या प्रकारे उपयोग होवू शकेल. तसेच यामुळे जामखेड सारख्या ग्रामीण भागातून जावूनही राज्य व देशपातळीवर आपण नाव कमवू शकतो, असामान्य कर्तृत्व गाजवू शकतो असा विश्वास येथील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होवू शकेल. व संस्थेतील कर्मचाऱ्यांनाही यापासून प्रेरणा मिळेल ही या पुरस्कार देण्यामागील संस्थेची भूमिका आहे असे शशिकांत देशमुख म्हणाले.