महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलांचा रोहित पवारांवर जोरदार निशाणा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 21 ऑक्टोबर 2022 ।  शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपाचा डाव आहे, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकता केला होता. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. परंतू आता पवारांच्या या वक्तव्यावरून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मोठं वक्तव्य करत रोहित पवारांवर निशाणा साधलायं.

Revenue Minister Radhakrishna Vikhe-Patil's strong target on Rohit Pawar

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांच्या या आरोपावर वक्तव्यावर खोचक प्रतिक्रीया दिली आहे. रोहित पवारांचे हे वक्तव्य प्रसिद्धीसाठी केले आहे. पवारांचे घर फोडायला आम्ही मोकळे नाही. त्यासाठी इथे कुणालाही वेळ नाही. मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी अधोगती झाली ती आम्हाला भरून काढायची आहे, असे म्हणत विखे यांनी पवारांवर खोचक टीका केली.

राज्याचं नुकसान झालं आहे, ते भरून काढायचं आहे. आम्हाला राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायची आहे. त्यामुळे कोणाचे घर फोडायला वेळ नाही, त्यासाठी आम्ही मोकळे नाही, अशा शब्दात विखेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

शिवसेनेनंतर भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे, असं रोहित पवार म्हणाले होते. पवार घराण्यातही फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे त्यांनी म्हंटले होते. याबाबत प्रश्न विचारले असता विखे पाटील यांनी रोहित पवारांचा समाचार घेतला.