अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसर्‍या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या एका विधानामुळे शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात मध्यावधी निवडणुका लागतात की काय? या चर्चांना उधाण आलेलं असतानाच, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Finally time has come for second cabinet expansion of Shinde-Fadnavis government,

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास चार महिने होत आले आहेत. नव्या सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार अजूूनही झालेला नाही. त्यामुळे मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले अनेक जण अस्वस्थ आहेत. सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याने  विरोधकांकडून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण आता मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे सर्व 50 आमदार पुन्हा दोन दिवस गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौर्‍यात ते कामाख्यादेवीचं दर्शन घेणार आहेत. शिंदे गट महाराष्ट्रात परतल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली असल्याचे वृत्त टीव्ही 9 मराठीने दिले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच मंत्रीपद मिळालं नाही म्हणून नाराज होणाऱ्या आमदारांना महामंडळ देण्याचा शिंदे सरकारचा प्लॅन असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार आणि खासदारांसह येत्या 26 नोव्हेंबरला पुन्हा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गुवाहाटीहून आल्यावर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मंत्रीमंडळाचा विस्तार होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार?

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागण्याचे संकेत आतापर्यंत विरोधकांकडून दिले जात होते. पण आता सत्ताधारी पक्षातीलच ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी विधान केल्याने संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. राज्यात कधी काय होईल काहीच भरोसा नाही. महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे यांच्या विधानामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलीत सापडलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे-फडणवीस सरकार शंभर टक्के कोसळणार असल्याचं विधान केलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मंत्रिमंडळ न मिळाल्याने आमदार नाराज आहेत. त्यामुळे ते बंडखोरी करतील, असं विधान केलंय.