जामखेड टाइम्स वृत्तसेवा । भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या माघारीच्या निर्णयाआधीच अनेक नाट्यमय घडामोडींनी अंधेरी पोटनिवडणूक देशात चर्चेत आली होती. पटेल यांच्या माघारीमुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते, परंतू अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी ०७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिल्याने पोटनिवडणूक अटळ बनली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग रोखला गेला असला तरी ऋतुजा लटके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी १४ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती.आज दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत होती. त्यानुसार आज दुपारी ३ वाजेपर्यंत १४ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे ०३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेत ७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत.
खालील उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली
- निकोलस अल्मेडा (अपक्ष)
- मुरजी(काका) कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
- साकिब जफर ईमाम मल्लिक (अपक्ष)
- राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
- चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
- पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
- चंदन चतुर्वेदी (अपक्ष)
अर्ज मागे घेतल्यानंतर मतदान प्रक्रियेसाठीच्या अंतिम यादीतील उमेदवार खालील प्रमाणे
- ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)
- बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)
- मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
- नीना खेडेकर (अपक्ष)
- फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
- मिलिंद कांबळे (अपक्ष)
- राजेश त्रिपाठी (अपक्ष)
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक पार पडत आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली आहे. लटके यांच्याविरोधात भाजपने मुरजी पटेल या उमेदवाराला रिंगणात उतरवले होते. परंतू राज ठाकरे यांचे पत्र, शरद पवार यांनी केलेले अवाहन त्यानंतर भाजपने लटके यांच्याविरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही निवडणूक लटके यांच्यासाठी एकतर्फी बनली आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी पक्षाच्या आदेशानुसार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.या निर्णयामुळे पटेल यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. नाराज कार्यकर्त्यांनी आक्रमक होत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात राज ठाकरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत.
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आक्रमक झालेल्या पटेल समर्थकांनी मनसे आणि भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरे यांच्या पत्रानंतरच मुरजी पटेल यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली असे पटेल समर्थकांचे म्हणणे आहे. आक्रमक कार्यकर्त्यांनी राज ठाकरे मुर्दाबाद मनसे हाय हाय अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता.