वीज अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे वाटप

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 21 ऑक्टोबर 2022 । वीजेचा शॉक लागून मृत्यू झालेल्या चार मुलांच्या कुटुंबीयांची राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज पुन्हा भेट घेतली. प्रत्येक कुटुंबाला चार लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेश त्यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. जनसेवा फौंडेशनच्या वतीने या कुटुंबाला किराणा साहित्यही देण्यात आले.या कुटूबीयांकरिता घरकुलांचा प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून आठ दिवसात मंजूरीचे पत्र देण्यात येईल. अशा शब्दांत पालकमंत्र्यांनी या कुटुंबांना आश्वस्त केले.

Distribution of government assistance of four lakh rupees each to the heirs of the deceased in the electricity accident, Radhakrishna vikhe patil Sangamner News,

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी अंतर्गत असलेल्या वांदरकडा येथील नाल्यात तुटलेल्या वीजवाहक तारेचा धक्का बसून अनिकेत अरूण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे व  विराज अजित बर्डे या चार कुमारवयीन मुलांचा  मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. घटनेच्या दिवशीच पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी या कुटूबीयांची भेट घेवून त्यांना सर्वेतोपरी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. निष्काळजीपणा  करणाऱ्या अधिकाऱ्यांवर  मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी श्री.विखे पाटील यांच्या भेटीनंतर  मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

चारही मुलांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने तसेच अन्य विभागाकडून मदत मिळावी म्हणून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाचा पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी व्यक्तिगत पाठपुरावा केला होता. वीज वितरण कंपनीने मंजूर केलेले प्रत्येकी चार लाख रुपयांचे धनादेश या कुटुंबांना आज पालकमंत्र्यांच्या हस्ते अकलापूर येथे देण्यात आले. अन्य योजनेतील धनादेशही लवकरच या कुटुंबाला  दिले जातील. असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Distribution of government assistance of four lakh rupees each to the heirs of the deceased in the electricity accident, Radhakrishna vikhe patil Sangamner News,

शासनाच्या ‘आनंदाचा शिधा’ चे कीट ही या कुटुंबीयांना देण्यात आले. यावेळी संगमनेर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक सुनिल पाटील, वीजवितरण कंपनीचे अभियंता श्री.थोरात यांच्यासह बापुसाहेब गुळवे, श्रीराम गणपुले, जावेद जहागिरदार, डाॅ.सोमनाथ कानवडे सतिष कानवडे, अमोल खताळ  किशोर डोके, जनार्दन आहेर, राहूल भोईर, संजय देशमुख, साहेबराव वलवे उपस्थित होते.

Distribution of government assistance of four lakh rupees each to the heirs of the deceased in the electricity accident, Radhakrishna vikhe patil Sangamner News,

पालकमंत्री विखे- पाटील म्हणाले की, घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा यामध्ये निष्काळजीपणा कारणीभूत ठरला. परंतू, या कुटुंबांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. सरकार संवेदनशील असल्यामुळेच मदतीचे धनादेश तातडीने दिले गेले. अन्य मदत मिळण्यासाठी व्यक्तिगत पाठपुरावा करणार असून घरकुलांचे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला तातडीने मंजूरी देण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.