शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महत्वाचे आदेश

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यात अनेक ठिकाणी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांचे विज जोडणी कापल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ज्या शेतकर्‍यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरले आहे, अशा शेतकर्‍यांच्या वीजजोडण्या कापू नयेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत.

Deputy Chief Minister Devendra Fadnavis gave important orders regarding the electricity bill recovery of farm agricultural pump

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचं नुकसान झाल्याने राज्यातील शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना वीज बील वसुलीत सूट द्यावी, असे आदेश दिले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले,ज्यांच्याकडे नुकसान नाही त्यांनी नियमित वीज भरणा करावा. नुकसानग्रस्त भागात भविष्यात वसुली करता येईल. परंतु, शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत,असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यंदा प्रथम अतिवृष्टी आणि नंतर परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशातच आता शेतीपंपांची बिले थकल्याने वीज वितरण कंपन्यांनी शेतीपंपांची कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर महावितरणने बिल वसुलीसाठी रोहित्र बंद करण्याचा, छोट्या डीपी काढण्याचा धडाका लावला आहे.

वीज वितरण कंपन्यांच्या कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे विहिरीत पाणी असून देखील शेतीला पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकं सुकून जात आहेत. आधी अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन तोडणी मोहिमेमुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे महावितरण विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालू बिल भरलेल्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडू नका असे आदेश दिले आहेत.