संभाजी भिडे गुरूजींचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, राज्यभरातून उमटू लागल्या तीव्र प्रतिक्रिया, राज्य महिला आयोगाने घेतली ‘त्या’ विधानाची गंभीर दखल, उचलले महत्वाचे पाऊल
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । कायम वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून देणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी आणखीन एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन असे विधान भिडे यांनी महिला पत्रकाराशी केल्याने राज्यभरात या विधानावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भिडे यांच्या विधानाची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आज मुंबईत आले होते. त्यावेळी एका महिला पत्रकाराने भिडे गुरूजींशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, कुंकू लाव तरच तुझ्याशी बोलेन, असे म्हणत महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार दिला. भिडे गुरूजींनी महिलेसह पत्रकारितेचा अपमान केल्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे.
मंत्रालयात आलेल्या संभाजी भिडे गुरूजी यांना एका महिला पत्रकाराने विचारले की, तुम्ही आज मंत्रालयात आला होतात,तुम्ही कोणाची भेट घेतली? असा प्रश्न विचारताच भिडे म्हणाले, तु आधी टिकली लाव, मग मी तुझ्याशी बोलेन, आम्ही अशी भावना आहे की, प्रत्येक स्त्री भारत मातेचे रूप आहे, भारत माता विधवा नाही, तु आधी कुंकू लाव, मग मी तुझ्याशी बोलेन
भिडे गुरूजींच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळासह समाज माध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील म्हणाल्या की , मुळात बाईनं टिकली लावायची की नाही हा तिचा वैयक्तिक अधिकार आहे. ती कुठल्या धर्माची आहे हे महत्वाचं नाही. कारण कुठल्या धर्मात जन्माला येताना धर्म मागून जन्माला येत नसतं. भिडे गुरुजींचं कुठे मनावर घेता, ते आता म्हातारं माणूस झालेले आहेत. ते साठी बुद्धी नाठी म्हटलं तरी चालेल, अशा माणसांचे बाईटच घेऊ नयेत. हे महिलांना अपमान करत आहेत, पूर्वीची प्रथा ते परत आणू इच्छित आहेत”
दरम्यान भाजपनेही भिडे गुरूजींच्या वक्तव्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे, भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले म्हणाले, कुठल्याही धर्मात किंवा संस्कृतीत महिलांचा अनादर करणं हे बसत नाही. महिलांचा सन्मान करणं हीच आपली संस्कृती आहे. महिलांचा सन्मान केला जावा हीच आमची भूमिका आहे. पण ते कशामुळं असं बोलले हे मला सांगता येत नाही. त्यामुळं ते जे बोलले आहेत ते अयोग्य बोलले आहेत, त्यामुळं या गोष्टीचं आम्ही कदापी समर्थन करणार नाही.
दरम्यान, राज्य महिला आयोगाकडून संभाजी भिडे गुरूजी यांनी महिला पत्रकाराशी बोलताना केलेल्या विधानाची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.
महिला पत्रकाराने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून आपण तिच्या प्रश्नावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. स्त्री चा दर्जा तिच्या कर्तृत्वाने सिध्द होत असतो, आपले वक्तव्य स्त्री सन्मानाला आणि सामाजिक दर्जाला ठेच पोहचविणारे आहे. आपल्या वक्तव्याबाबत समाजातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे.तरी कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भुमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२(३) नुसार तात्काळ सादर करावा असे पत्र राज्य महिला आयोगाकडून संभाजी भिडे गुरूजी यांना धाडण्यात आले आहे.