जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील हळगाव येथील जय श्रीराम साखर कारखान्या शेजारील एका शेततळ्यात एका 35 ते 40 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील श्रीराम शुगर कारखान्याच्या शेजारील आप्पा दशरथ ढवळे यांच्या शेतातील शेततळ्यात जाफर हुसेन सय्यद या व्यक्तीचा मृतदेह शेततळ्यातील पाण्यावर तरंगत असल्याचा आढळून आला आहे. ही धक्कादायक घटना आज दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.

सदर घटनेची माहिती पोलिस पाटील सुरेश ढवळे यांनी जामखेड पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जामखेड पोलिस दाखल झाले. पोलिसांनी रात्री सात वाजेच्या सुमारास मृतदेह तलावातून बाहेर काढला. मृतदेह पाण्यात असल्याने तो पूर्णता: सडल्याच्या अवस्थेत होता. मृतदेहाला मोठ्या जिकरीने पोलिसांनी तलावातून बाहेर काढले.

सदर मृत व्यक्तीच्या खिशात एक पाकिट सापडले, त्यात असलेल्या आधारकार्डवर जाफर हुसेन सय्यद असे नाव लिहलेले असल्याचे आढळून आले. सदर व्यक्ती हा उत्तर प्रदेश राज्यातील असल्याचे ओळखपत्रावरून स्पष्ट झाले.
दरम्यान सदर मृतदेहाच्या अंगात पांढरा शर्ट आणि निळी जिन्स पँट होती, सदर मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळीच केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, हेड काँस्टेबल संजय लोखंडे, पोलिस नाईक अजय साठे, पोलीस काँस्टेबल सतिश दळवी, चालक हनुमान आडसूळ, गुन्हा शोध पथकाचे संग्राम जाधव, अरूण पवार यांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह शेत तलावातून बाहेर काढला.
सदर मृत इसमाने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याबाबत जामखेड पोलिस वेगाने तपास करत आहेत.