जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे पुर्ण, 13995 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, शासनाकडे 22 कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची मागणी – तहसीलदार योगेश चंद्रे यांची माहिती

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. जामखेड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे प्रशासनाकडून पुर्ण करण्यात आले आहेत. 87 महसूल गावांमध्ये एकूण 13995 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.पिकांच्या नुकसानीसाठी शासनाकडे 22 कोटी रुपये अनुदानाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

Panchnama of the damaged area in Jamkhed taluka is complete, crop damage on 13995 hectares, compensation of 22 crore rupees has been demanded from the government - information of Tehsildar Yogesh Chandre

जामखेड तालुक्यात परतीच्या पावसाने मोठा हाहाकार उडवून दिला होता. या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. खरिप हंगामातील हातातोंडाशी आलेल्या घास निसर्गाने हिरावून घेतला होता. नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून होत होती. आमदार राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे यासंबंधीची मागणी केली होती.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि आमदार राम शिंदे यांनी 24 ऑक्टोबर 2022 रोजी खर्डा भागातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या, यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार महसूल विभागाने जामखेड तालुक्यातील 87 गावांमध्ये पंचनामे हाती घेतले होते.

ऐन दिवाळीत जामखेड तालुक्यातील 87 महसूल गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांच्या सहाय्याने पिक नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. प्रत्येक गावातील पंचनामा अहवाल एकत्रित केल्यानंतर जामखेड तालुक्यातील 87 गावांमध्ये एकूण 23656 शेतकर्‍यांचे 13995 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच 11 कच्च्या घरांची अंशतः पडझड झाल्याचे महसूल विभागाच्या संयुक्त पंचनाम्यात निदर्शनास आले.

जामखेड तालुक्यातील शेती पिकांचे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी शासनाकडे 22 कोटी रुपये अनुदानाची मागणी प्रशासनाकडून करण्यात आले आली. 

पिकांच्या नुकासानीमध्ये जिरायत पिकांचे 19527 शेतकऱ्यांचे 11990 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झालेले आहे. यात प्रामुख्याने सोयबीन, उडीद, मुग या पिकांचा समावेश आहे.

बागायत आणि हंगामी बागायत पिकांमध्ये 4129 शेतकऱ्यांचे 2005  हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने मका, तूर, मिरची, वांगे, कांदा, टोमाटो या पिकांचा समावेश आहे.

वरील सर्व पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शासनाकडे जिरायत पिकांसाठी 16.31 कोटी, बागायत पिकांसाठी 5.41 कोटी असे एकूण 22 कोटी रुपयाच्या शासकीय अनुदानाची मागणी केलेली आहे.

शासन निर्णयाप्रमाणे जिरायत पिकांसाठी प्रती हेक्टरी 13 हजार 600 रुपये, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये आणि फळ पिकांसाठी 36 हजार रुपये अशी अनुदान वाढ करण्यात आलेली  आहे. त्यानुसार अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यावर तात्काळ शेतकरी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल, असे तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले.

अंशतः पडझड झालेल्या 11 घरांसाठी नवीन निकषाप्रमाणे 1.65 लाख एवढे अनुदान मागणी करण्यात आलेली आहे. तसेच या कालवधीत शेतात काम करणाऱ्या एका जनावाराचा (बैल) वीज पडून मृत्यू झाल्याने त्यासाठी 30 हजार रुपये अनुदान मागणी करण्यात आली आहे.

जामखेड तालुक्यातील पिकनिहाय नुकसान खालीलप्रमाणे आहे.

  • सोयाबीन –  8263 हेक्टर
  • उडीद – 1195 हेक्टर
  • मुग – 33 हेक्टर,
  • कांदा – 1691 हेक्टर,
  • ज्वारी –  491 हेक्टर,
  • मका – 242 हेक्टर,
  • बाजरी – 17हेक्टर
  • तूर -1868 हेक्टर
  • मुग -33 हेक्टर
  • इतर पिके -160 हेक्टर

दरम्यान, अनावधानाने कोणत्याही शेतकऱ्यांचा पंचनामा करण्याचा राहून गेला असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या शेताचा फोटो आणि अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा, तो पंचनामा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अनुदान वाटप करणेकामी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते नंबर तलाठी,कृषी सहाय्यक,ग्रामसेवक यांचेकडेस जमा करावे असे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.