महाराष्ट्रात घातपाताचा कट ?, रायगड समुद्र किनारी आढळलेल्या संशयास्पद बोटीत सापडल्या AK 47 रायफल्स, गृहमंत्र्यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

रायगड : रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन ते तीन एके-47 आढळले आहेत. त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

Conspiracy of assassination in Maharashtra? AK 47 rifles found in suspicious boat found off Raigad beach, Home Minister devendra fadanvis gives important information in Assembly

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या. त्याशिवाय 225 राउंड्स गोळ्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात. या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे. तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असलेल्या किनाऱ्यावर संशयास्पद बोट शस्त्रांसह आढळून आल्याने गंभीर बाब समजली जात आहे. पोलिसांनी जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही स्थानिकांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बोट समुद्रात अडकल्याचे दिसून आले. काही स्थानिकांनी या बोटीत काय आहे, याची पाहणी केली. स्थानिकांना रायफल आणि बुलेट्स आढळून आल्या. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर तहसीलदारांनी आणि स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या बोटीवर असलेल्या रायफलच्या बॉक्सवर एका कंपनीचे नाव दिसून आले. ही स्पीड बोट असल्याची माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिली.

घातपाताचा कट?

रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते. त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते. या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि रायगड भागात हाय अलर्ट देण्यात आला आहे.

श्रीवर्धन, रायगडच्या Raigad आमदार आदिती तटकरे यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार, रायगडमधील श्रीवर्धनच्या हरिहरेश्वर आणि भरडखोलमध्ये शस्त्रे आणि कागदपत्रांसह काही बोटी सापडल्या आहेत. स्थानिक पोलिस तपास करत आहेत, मी सरकारकडे ATS किंवा राज्य एजन्सीची विशेष टीम तात्काळ नियुक्त करण्याची मागणी केली आहे. हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याजवळ एक संशयास्पद बोट आढळून आल्यानंतर रायगड जिल्हा आणि लगतच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिस तपास सुरू आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोटीवर लाइफबोट आणि शस्त्रे सापडली आहेत. महाराष्ट्र एटीएसचे पथक रायगडकडे रवाना झाले असून, हरिहरेश्वर समुद्रकिनारी शस्त्रांसह एक संशयास्पद बोट सापडली आहे. एटीएसचे पथक पोहोचले आहे. ही बोट ऑस्ट्रेलियन महिलेची असल्याची माहिती समोर आली आहे.

रायगड जिल्ह्यात सापडलेल्या संशयास्पद बोटीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. विधानसभा तालिका अध्यक्षांनी याप्रकरणी सरकारला चौकशीचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेमध्ये याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. रायगडच्या हरिहरेश्वरच्या किनाऱ्यावर एक बोट दुर्घटना अवस्थेत सापडली आहे. या बोटीत 3 AK-47 आणि काडतुसं सापडली. या बोटीचं नाव लेडी हान आहे, तसंच ही बोट ऑस्ट्रेलियन आहे. ऑस्ट्रेलियन महिलेची ही बोट असून या बोटचा कॅप्टन महिलेचाच नवरा आहे. एका कोरियन युद्ध नौकेने त्याला मदत केली आहे. ही बोट मस्कतवरून युरोपला जात होती, असं फडणवीस म्हणाले.

दिनांक 26- 6- 2022 रोजी सकाळी 10 च्या सुमारास या बोटीचे इंजिन निकामी झाले. खलाशांनी मदतीसाठी कॉल दिला. त्याच दिवशी दुपारी 1 वाजेच्या सुमारास एका कोरियन युद्धनौकेने बोटीवरील खलाशांची सुटका केली. त्यांना ओमानला सुपूर्द केले.समुद्र खवळलेला असल्याने लेडी हान या बोटीचे टोइंग करता आले नाही. समुद्राच्या अंतर्गत प्रवाहामुळे भरकटत ही नौका हरिहरेश्वर किनाऱ्याला लागलेली आहे. अशी माहिती भारतीय कोस्टगार्डकडून प्राप्त झालेली आहे.स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक या घटनेचा तपास करत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस घटकांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.