चालकाची बोबडी वळली अन् भांडाफोड झाला…


पुणे |प्रतिनिधी

ट्रकमध्ये काय आहे… नही, सहाब खात है.. किधर जा रहा है…नही सहबा इधर ही..म्हणजे इधर कुठे…अशा प्रकारे सवाल-जबाव सुरु होते. चालक समाधानकारक उत्तरे देत नव्हता. त्यामुळे अधिकार्‍यांचा संशय अधिकच बळावला… खताच्या गोण्याखाली काय आहे, याचा शोध घेण्यासाठी खताच्या गोण्या बाजूला केले आणि त्याखाली अधिकार्‍यांना घबाड सापले…

नाताळ आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी मद्याचे प्याले रिचवले जातात. ही संधी पाहून मद्य तस्कर ही सक्रीय होतात. मद्याचा साठा करण्यासाठी मळीपासून तयार करण्यात आलेल्या खताच्या अडून गोवा राज्याची निर्मिती विदेशी मद्याचे 710 तर बीअरचे 201 बॉक्सची वाहतूक केली जात होती. उत्पादन शुल्क विभागाने मद्यसाठ्यासह 56 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर तीन आरोपिंना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 
सुरेश बारकु (वय-36, मु. पो. भडगोन ता. पानसेमल, जि. बडवानी, मध्यप्रदेश), प्रकाश रमेश सोनवणे (वय -35, मु. पो. खेतीया. ता. पानसेमल, जि. बडवानी, मध्यप्रदेश) व अर्जून संतोष तिरमले (वय -32, रा. जुना प्रकाशा रोड, शहदा, जि. नंदुरबार) यांना अटक करण्यात आली आहे. 

उत्पादन शुल्कच्या भरारी पथक-2 च्या अधिकार्‍यांना फलटन-बारामती मार्गावर मद्याची चोरट्या मार्गाने वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार बारामती तालुक्यात तीन ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. सांगवी येथून बारामतीच्या दिशेने निघालेला ट्रक क्रमांक एम.एच.18 एम.8184 च्या चालकाला थांबण्याचा इशारा पथकातील अधिकार्‍यांनी केला. मात्र, चालकाला संशय आल्याने तो सुसाट वेगाने निघून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पथकातील अधिकार्‍यांनी पाठलाग करुन ट्रक अडविला. त्यानंतर ट्रकची झडती घेतली असता. त्यामध्ये मळीपासून तयार केलेले खताच्या गोण्या आढळून आल्या. यावेळी चालकाकडे चौकशी केली असता, तो समाधानकारक उत्तरे देत नव्हता. त्यामुळे खताच्या गोण्याच्या अडून गोवा बनावटीचे मद्य आणि बीअरच्या बॉक्सची वाहतूक केली जात होती.

कारवाई भरारी पथक क्रमांक दोन च्या अधिकार्‍यानी आयुक्त कांतीलाल उमाप, उप आयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात उप अधीक्षक संयज जाधव, संजय पाटील, भरारी पथकाचे निरिक्षक अनिल बिराजदार, विजय मनाळे, दुय्यम निरिक्षक विकास थोरात, डी.बी. पाटील, विठ्ठल रसाळ, प्रशांत धाईंजे, अनिल सुतार, जवान नवनाथ पडवळ, आर.बी. सावंत, सचिन मांडेकर, रवी लोखंडे, अनिल थोरात, विनोद पटकुरे, विजय विंचूरकर आदींचा सहभाग होता.