मोठी बातमी : नरभक्षक बिबट्याचा करमाळ्यात खात्मा !


‌करमाळा / अक्षय आखाडे

करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभागाला अखेर शुक्रवारी( ता १८) यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला.

करमाळा तालुक्यातील वांगी नं.४ येथील रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे या शेतकऱ्याचा केळीच्या बागेत बिबट्याला वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी २० फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर ३ गोळ्या फायर करीत त्याचा खात्मा केला.त्यांच्याबरोबर बिटरगावचे महेंद्र पाटील, नागनाथ मंगवडे उपस्थित होते.

या नरभक्षक बिबट्याने तालुक्‍यात मोठी दहशत घातली होती. तालुक्‍यातील तीन जणांचे बळी या बिबट्याने घेतले होते. ३ डिसेंबर रोजी फुंदेवाडी येथील कल्याण देविदास फुंदे, तर५ डिसेंबर रोजी अंजनडोह येथील जयश्री दयानंद शिंदे आणि, ७ डिसेंबर रोजी चिखलठाण येथे लांडा तांडा शिवारात फुलाबाई अरचंद कोटली ही ऊस तोडणी कामगाराची आठ वर्षांची मुलगी यांच्यावर नरभक्षक बिबट्याने हल्ला करून तिघांचाही बळी घेतला होता.

तसेच बिबट्याने शेतकऱ्यांच्या अनेक पाळीव प्राण्यांवर देखील हल्ले करून ठार केले होते. त्यामुळे करमाळा तालुक्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या नरभक्षक बिबट्यास मारण्यासाठी शार्पशूटर बोलाण्यात आले होते.अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते.