जामखेड : नव्या मुख्याधिकाऱ्यांच्या स्वागतासाठी राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या रांगा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या बदलीनंतर अजय साळवे हे नवे मुख्याधिकारी म्हणून जामखेडला बदलून आले आहेत. सोमवारी त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. साळवे यांच्या स्वागतासाठी जामखेड शहरातील राजकीय नेत्यांचे जथ्थेच्या जथ्थे नगरपरिषदेत आज दाखल होत असल्याचे चित्र दिवसभर दिसून आले.

Queues of political leaders and activists to welcome the new mukhyadhikari ajay salve

जामखेड नगरपरिषदेचे 19 वे मुख्याधिकारी म्हणून अजय साळवे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. साळवे यांच्या स्वागतासाठी जथ्थेच्या – जथ्थे जामखेड नगरपरिषदेत आज दिवसभर धडकत होते. भाजप, राष्ट्रवादी आणि बाळासाहेबांची शिवसेना या राजकीय पक्षांसह अनेक जण शिष्टमंडळासह साळवे यांचे स्वागत करताना दिवसभर दिसले.

जामखेडचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगर पंचायतीत मुख्याधिकारी म्हणुन कार्यरत असलेले अजय साळवे यांची बदली जामखेडला करण्यात आली. मुख्याधिकारी दंडवते यांची बदली व्हावी यासाठी भाजपने मुख्यमंत्र्यांना साकडे घातले होते. भाजपच्या मागणीमुळे दंडवते यांची बदली झाली होती. दंडवतेंच्या बदलीचा शहर भाजपने जल्लोष साजरा केला होता.

जामखेड शहराचे अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. विशेषता: शहर विकास आराखडा परिपूर्ण बनवण्याचे मोठे अव्हान नवे मुख्याधिकारी अजय साळवे यांच्यासमोर असणार आहे. त्याचबरोबर शहरासाठी मंजुर झालेली 250 कोटी रूपये खर्चाची पाणी आणि मलनिस्सारण योजना दर्जेदार करण्यासाठी साळवे यांना अधिक लक्ष घालावे लागणार आहे.