Karjat Jamkhed MIDC : रोहित पवारांनी फपार्‍या हाणणं बंद करावं – आमदार राम शिंदेंनी घेतला रोहित पवारांचा जोरदार समाचार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। जामखेड नगरपरिषद पाणी योजनेच्या श्रेयावरून भाजप आणि राष्ट्रवादीत रंगलेले वादळ शमत नाही तोच, आता आणखीन एका विषयावरून भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत. आमदार रोहित पवारांनी MIDC मंजुर झाल्याचा दावा केला. यावर आमदार राम शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कर्जत-जामखेडसाठी MIDC मंजुर मग शासन निर्णय कुठेय ? असा सवाल करत  हे आणलं, ते आणलं, असल्या फपार्‍या हाणणं रोहित पवारांनी बंद केलं पाहिजे, अशी कडवट टीका करत आमदार राम शिंद यांनी टीकेचा बार उडवून दिला आहे.यामुळे पुन्हा एकदा कर्जत जामखेड मतदारसंघातील राजकारण तापले आहे.

MLA Ram Shinde took strong attack on Rohit Pawar, Karjat Jamkhed MIDC, ram shinde latest news,

कर्जत तालुक्यातील खंडाळा आणि पाटेगाव भागात मतदारसंघासाठी MIDC ला तत्वता: मंजुरी मिळून सदर जागेला उच्चाधिकार समितीची मंजुरी मिळाली, अश्या बातम्या आमदार रोहित पवारांकडून प्रसिध्द करण्यात आल्या.यावर प्रतिक्रिया देताना आमदार राम शिंदे म्हणाले की, मी जामखेड पाणी पुरवठा योजनेची मंजुरी आणली, पाच तासांत मुख्यमंत्री कार्यालयाने ऑर्डर दिली, ती मी सोशल मिडीयावर टाकली. कोणतीही गोष्ट ज्या वेळेस मंजुर होते, त्यावेळेस मी शासन निर्णय सोशल मिडीयावर टाकतो. परंतू योजना मंजुर झालीय तर मग त्याचा शासन निर्णय सोशल मिडीयावर टाकण्याबरोबरच पत्रकारांना दिला पाहिजे.परंतू ते रोहित पवारांनी केलं नाही, हे आणलं, ते आणलं असल्या फपार्‍या हाणणं आता रोहित पवारांनी बंद केलं पाहिजे, असे म्हणत आमदार राम शिंदेंनी रोहित पवारांचा जोरदार समाचार घेतला.

भूलथापा मारणं बंद करा

आमदार राम शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या अडीच तीन वर्षात त्यांच्या ह्या (MIDC) कामाला यश आलं नाही, त्यामुळं लोकं प्रश्न विचारतील या भावनेनं त्यांनी विधीमंडळात प्रश्न उपस्थित केला असेल, त्या अनुषंगाने ही बातमी आली असेल असा माझा समज आहे. कारण जर योजना मंजुर असती तर आज सोशल मिडीयावर शासन निर्णय पोस्ट झालेला दिसला असता. पण तसं काही झालं नाही, त्यामुळे अश्या पध्दतीच्या भूलथापा मारणं आता बंद केलं पाहिजे, असे शिंदे म्हणाले.

20 तारखेला तुमच्या विरोधात निकाल गेलाय..

लोकांनी आता तुम्हाला चांगल ओळखलयं, एवढी मोठी चपराक तुम्हाला ग्रामपंचायत निवडणुकीत बसलीय, अजून चार दिवसही झाले नाहीत, 20 तारखेला तुमच्या विरोधात निकाल गेलाय, त्यामुळे जे काही आहे नाही ते स्पष्टपणे पाहिजे, खरं पाहिजे, पारदर्शक पाहिजे, लोकांना अश्वासक पाहिजे, मात्र तसं होताना दिसत नाही, असे म्हणत शिंदे यांनी पवारांचा भूलवाभूलवीवर हल्ला चढवला.

मीच MIDC चा प्रश्न मार्गी लावणार

आपली सत्ता असताना, आपलं सरकार असताना काहीही न करू शकलेले लोकप्रतिनिधी आता हा केविलवाणा प्रयत्न करत्येत, करायचाच असेल, होणारच असेच, मी आणि माझं सरकार यास कटिबद्ध आहोत, येणाऱ्या कालखंडात आम्ही ते करून दाखवू, असे म्हणत आमदार राम शिंदे यांनी मीच MIDC चा प्रश्न मार्गी लावणार, अशी गर्जना केली.