अखेर संजय राऊत ईडीच्या ताब्यात, नऊ तासाच्या चौकशीनंतर कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : अखेर ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु होती. तब्बल साडेनऊ तासांच्या चौकशीनंतर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊत यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती समोर आली असून, अद्याप खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने धाड टाकली आहे. सकाळपासून कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. संजय राऊत यांच्या भांडुपनंतर कांजूरमार्ग आणि दादर येथील घरावरही ईडीने धाडी टाकल्या आहेत. कांजूरमार्ग येथील मैत्री बंगला आणि दादर येथील गार्डन कोर्ट येथील घरावर हा छापा टाकला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर, राऊतांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली असून ठिय्या आंदोलन करत आहेत.

काय आहे पत्रा चाळ प्रकरण?

पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.