जामखेड : फायरबाॅल गोडाऊनच्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शनिवारी भरदुपारी जामखेड शहराजवळील एका फायरबाॅल गोडाऊनला भीषण आग लागण्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत दोन जणांचा होरपळून जागेवर मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.वीजेच्या शाॅर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक, पोलिस दल आणि अग्निशमन यंत्रणेने तातडीने मदत केली. ही घटना जामखेड – अहमदनगर मार्गावरील सावळेश्वर ट्रॅक्टर शोरूमच्या पाठीमागील बाजूस घडली.

Jamkhed, Two died, two seriously injured in a fierce fire, the fire started in Fireball Godown, jamkhed news

जामखेड येथील पंकज शेळके यांच्या मालकीचे रेडमॅटीक ऑटोमॅटीक फायर फायटरचे उत्पादन करण्याचे (आग विझवण्याचे साधन) गोडाऊन गेल्या दोन वर्षांपासून जामखेड – अहमदनगर मार्गावरील सावळेश्वर ट्रॅक्टर शोरूमच्या पाठीमागील बाजूस कार्यरत आहे.आज 13 मे 2023 रोजी दुपारी एक ते दोन वाजेच्या सुमारास शेळके यांच्या फायरबाॅल गोडाऊनमध्ये नेहमीप्रमाणे काम सुरू होते. यावेळी ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे व जहीर सत्तार मुलानी हे दोघे कामगार गोडाऊनमध्ये काम करत होते. तर इतर दोघे गोडाऊन परिसरात होते. याचवेळी गोडाऊनमध्ये वीजेचे शाॅर्ट सर्किट झाल्याने आग लागली.अचानक लागलेली ही आग वेगाने गोडाऊनभर पसरली होती.

फायरबाॅल गोडाऊनला लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले होते. गोडावूनमधून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते. गोडाऊनमध्ये नेमके किती कामगार असतील याचा स्थानिकांना अंदाज येत नव्हता, यावेळी जेसीबीच्या सहाय्याने गोडाऊनच्या भिंतीला भगदाड पाडण्यात आले. त्यामुळे गोडाऊनमधून धुराचे मोठे लोळ बाहेर पडत होते. शिवाय आगीमुळे गोडावूनमधील फायरबाॅलचे स्फोट होत होते. या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.आगीच्या रौद्र रूपामुळे बचाव कार्यासाठी कोणालाही गोडाऊनमध्ये घुसता आले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांचे पथक, नगरपरिषदेची अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. यावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी शर्थीचे प्रयत्न केले. दीड तासानंतर आग अटोक्यात आली खरी पण गोडावूनमध्ये काम करत असलेल्या दोघा कामगारांचा या आगीत होरपळून दुर्दैवीरित्या मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.मृत्यू झालेल्या कामगारांमध्ये ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे वय ४५ रा घोडेगाव.ता.जामखेड व जहीर सत्तार मुलानी, वय ३५ रा तेरखेडा. ता कळंब जि धाराशिव यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये गणेश पवार रा.जामखेड व पुजा पठाडे वय २४ यांचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आग विझवण्यासाठी अग्नीशामक दलाचे जवान अय्याज शेख, विजय पवार,अहमद सय्यद, पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, अनिल भारती व त्यांचे सहकारी तसेच शंकर बोराटे,दिपक भोरे, तनवीर मुलानी, निखिल कुमकर, गोकुळ जाधव, सनी सदाफुले, बापु गायकवाड, विशाल ढवळे, सुनील मोरे सह स्थानिक नागरिकांनी मोठी मदत केली. 

अहमदनगर रोडवरील फायरबाॅल गोडाऊनला भरदुपारी लागलेल्या भीषण आगीच्या धुराचे लोट शहराच्या सर्वच भागात दिसत होत. ऐन दुपारी शहरात घडलेल्या या दुर्घटनेमुळे शहरवासियांची धावपळ उडाली होती. मात्र घटना शहराबाहेर घडली असल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. परंतू या घटनेत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच शहरावर दु:खाचे सावट पसरले.

दरम्यान, ही आग का लागली ? फायरबाॅल गोडाऊनमध्ये सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती का? याबाबत प्रशासनाने योग्य तो तपास करणे आवश्यक आहे.दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यांविरोधात पोलिस प्रशासन काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.