जामखेड तालुक्यातील 28 गावांमध्ये सलग दोन दिवस मोठे लोडशेडिंग, कारण काय ? वाचा सविस्तर !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । एकिकडे सूर्यनारायण आग ओकत असतानाच वीज गुल होण्याचे प्रकार वाढले आहेत. उकाड्याने हैराण झालेली जनता, सततच्या वीज भारनियमनाने त्रस्त झाली आहे.लाईटच्या सतत ये – जा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागासह जामखेड शहरातील जनता यामुळे त्रस्त झालेली आहे.आता या त्रासात आणखी भर पडणार आहे.महावितरणकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार जामखेड तालुक्यातील तीन उपकेंद्राचा वीज पुरवठा सलग दोन दिवस खंडीत होणार आहे.

Jamkhed news, 28 villages in Jamkhed taluka will have big loadshedding for two consecutive days, what is the reason? Read in detail

सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे.त्यामुळे वीजेच्या मागणीत मोठी वाढ झाली. गेल्या आठवडाभरापासून तालुक्यात उष्णतेची मोठी लाट सक्रीय आहे. उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी नागरिकांकडून एसी, कुलर, पंखे यांचा वापर वाढला आहे. त्यातच वीजेचा लपंडाव सतत होत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अश्यातच शनिवारी आणि रविवारी या सलग दोन दिवसांत तीन वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा तब्बल 15 ते 16 तास खंडित राहणार असल्याची सुचना महावितरणने जारी केली आहे.

महावितरणने जारी केलेल्या सूचनेनुसार शनिवार दि.13 मे 2023 रोजी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 6.00 व रविवार दि.14 मे 2023 रोजी सकाळी 8 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत  33 केव्ही जामखेड उपकेंद्र, 33 केव्ही अरणगाव उपकेंद्र, 33 केव्ही राजुरी उपकेंद्र या तीन वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा बाधित होणार आहे. अहमदनगर- आष्टी 132 केव्ही वाहिनीवर अत्यंत महत्वाचे काम करावयाचे असल्यामुळे या तीन वीज उपकेंद्रांचा वीज पुरवठा बाधित होणार आहे, अशी माहिती महावितरणकडून जारी करण्यात आलेल्या सूचनेत देण्यात आली आहे.

शनिवारी आणि रविवारी अहमदनगर- आष्टी 132 केव्ही वाहिनीवर महावितरणकडून महत्वाचे काम करण्यात येणार असल्यामुळे जामखेड तालुक्यातील भुतवडा, लेहनेवाडी, धोत्री, सावरगाव, मोहा, चुंबळी, बटेवाडी, जमदारवाडी, जामवाडी, साकत फाटा, कुसडगाव, अरणगाव, पिंपरखेड, हळगाव, चोंडी, कवडगाव, गिरवली, डोणगाव, पाटोदा, धानोरा, राजुरी, शिऊर, सारोळा, वाघा, घोडेगाव, आपटी, पिंपळगाव उंडा, पिंपळगाव आळवा या 28 गावांचा वीजपुरवठा बाधित होणार आहे. शनिवारी 10 तर रविवारी 5 तास वीजपुरवठा बंद राहणार आहे.याकाळात महावितरण कंपनीला सहकार्य करण्याचे अवाहन, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश कासलीवाल यांनी केले आहे.