जामखेड ब्रेकिंग : जामखेड पोलिसांकडून हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, एक जण अटकेत

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । फेसबुकद्वारे (Facebook) फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पुरूषांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी हनी ट्रॅप (Honey Trap Gang) टोळी जामखेड (Jamkhed) तालुक्यात सक्रीय असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका ट्रक ड्रायव्हरची अश्याच प्रकारे फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला.जामखेड पोलिसांनी हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमांतून हनी ट्रॅप करणारी टोळी उजेडात आल्याने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Jamkhed police busts honey trap gang, arrests one, jamkhed breaking news)

Jamkhed police busts honey trap gang, arrests one, jamkhed breaking news

याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील चोभेवाडी नान्नज परिसरातील एका महिलेने फेसबुकच्या माध्यमांतून लातुर जिल्ह्यातील अहमदपुर येथील एका ट्रक ड्रायव्हरशी मैत्री केली होती. दोघांमध्ये फेसबुकवर बराच काळ संवाद झाल्यानंतर सदर महिलेने स्वता:चा फोन नंबर देत त्या ट्रक ड्रायव्हर सोबत प्रेमाच्या गप्पा मारण्यास सुरुवात करत सदर ड्रायव्हरला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. दोघांमधील संवाद वाढल्याने विश्वास पटला गेला. 11 मे 2023 रोजी सदर ट्रक ड्रायव्हरला संबंधित महिलेने भेटण्यासाठी नान्नज – चोभेवाडी गावात बोलावले होते. त्यानुसार तो या भागात आला होता.

पिडीत ट्रक ड्रायव्हर नान्नज – चोभेवाडी परिसरात आल्यानंतर संबंधित महिला त्याला आपल्या घरी घेऊन गेली. त्यानंतर त्या महिलेच्या नातेवाईकांनी ड्रायव्हरला लाठ्या काठ्यांनी मारहाण करत त्याच्याकडे पैश्यांची मागणी केली. परंतू ड्रायव्हरने पैसे न दिल्याने त्याला जबरदस्तीने कपडे काढायला लावून त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत जबरदस्तीने फोटो काढले.तसेच पैसे दिले नाही तर बलात्काराची खोटी तक्रार नोंद करील अशी धमकी दिली. त्यामुळे ड्रायव्हरने घाबरुन काही पैसे आरोपींना दिले.परंतु आरोपी महिला व तिचे नातेवाईक दिलेल्या पैशाने समाधानी नव्हते. आरोपी ड्रायव्हर यांची पत्नी व इतर नातेवाईक यांना ड्रायव्हरचेच मोबाईल वरुन फोन करुन पैशाची मागणी करीत होते. पैश्यांसाठी ड्रायव्हरला बांधून ठेवण्यात आले होते.

दरम्यान, आपल्या पतीसोबत काहीतरी बरे वाईट घडत आहे यांची कुणकुण ड्रायव्हरच्या पत्नीने ११२ नंबरवर कॉल करत सदर प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने ट्रक ड्रायव्हरच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता, ट्रक ड्रायव्हर हा जामखेड तालुक्यातील चोभेवाडी येथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जामखेड पोलीसांनी ड्रायव्हरचा शोध घेतला व सविस्तर चौकशी केली. ड्रायव्हरच्या तक्रारीवरून जामखेड पोलिस स्टेशनला हनी ट्रॅप करणारी महिला व तिच्या नातेवाईकांविरुध्द अन्यायाने कैदेत ठेवणे, खंडणी व दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. इतर फरार आरोपींचा जामखेड पोलिस कसून शोध घेत आहेत.सदरच्या कारवाईबाबत जनतेतून पोलीसांचे कौतुक होत आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक महेश पाटील सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती व जामखेड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांच्या पथकाने पार पाडली आहे.

सोन्याचे ड्राॅप करणारे आता हनी ट्रॅपमध्ये सक्रीय ?

जामखेड तालुक्यात विशिष्ट समुदायातील लोक सोन्याच्या ड्राॅप करण्यासाठी ओळखले जातात. आता यातील काही जण महिलांना पुढे करून सोन्याच्या ड्राॅप ऐवजी हनी ट्रॅपमध्ये सक्रीय तर झाले नाहीत ना ? असा संशय सदरच्या घटनेवरून निर्माण झाला आहे. सोन्याच्या ड्राॅपसाठी प्रसिध्द असलेले आता हनी ट्रॅपमध्ये सक्रीय झाल्याने संबंधितांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे.

पोलिस निरीक्षक महेश पाटील यांचे आवाहन

हनीट्रॅप मध्ये कोणी अडकले असल्यास न घाबरता त्यांनी जामखेड पोलिसांशी संपर्क साधावा, पिडीत व्यक्तींचा जामखेड पोलिस न्याय देतील, तसेच हनी ट्रॅप करणाऱ्या टोळीचा कायमस्वरूपी बिमोड करतील, त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे अवाहन जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.