मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवतेंच्या अचूक नियोजनामुळे जामखेड नगरपरिषद ठरली अहमदनगर जिल्ह्यात अव्वल !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख। आपल्या धडाकेबाज आणि नियोजनबद्ध कामांसाठी प्रसिद्ध असलेल्या मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज कामाच्या माध्यमांतून जामखेड नगरपरिषदेला अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आणण्याची किमया केली आहे.गोर गरिबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी सरकारने हाती घेतलेल्या  घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गोर गरिबांच्या आयुष्यात आनंदाचा मळा फुलवणाऱ्या मिनीनाथ दंडवते यांच्या याच धडाकेबाज कामाची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात रंगली आहे.

जामखेड नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी अचूक नियोजनासह घरकुल लाभार्थ्यांसोबत सतत संवाद ठेवल्यामुळे घरकुलांचे सर्वाधिक बांधकामे पुर्ण करण्यात जामखेड नगरपरिषद अहमदनगर जिल्ह्यात आघाडीवर आली आहे. मिनीनाथ दंडवते यांच्या धडाकेबाज कामाचा आणखीन एक नमुना यानिमित्ताने समोर आला आहे.

जामखेड नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या संकल्पनेतून जामखेड शहरातील प्रत्येक वॉर्डात दर महिन्याला घरकुल लाभार्थ्यांच्या बैठका घेण्यात आल्या, यातून घरकुल लाभार्थीच्या अडी अडचणी समजून घेण्यात आल्या, त्या अडचणी सोडविण्यासाठी नगरपरिषदेकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे नगरपरिषदेच्या या उपक्रमाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला, यातूून घरकुलांची कामे वेळेत पुर्ण होण्यास गती प्राप्त झाली.

घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा प्लॅन तयार करण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी नगरपरिषदेने प्रती घरकुल हजार रुपये दराप्रमाणे दोन खाजगी आर्किटेक्चरची नेमणूक केली, त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांना प्रस्ताव तयार करण्यासाठी मोठी मदत झाली.

विविध टप्प्यांवर बांधकाम पूर्ण करून नगरपरिषदेेला फोटो देताच लाभार्थांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करण्याचे धोरण नगरपरिषदेने अवलंबवले, यामुळे लाभार्थ्यांमध्ये सकारात्मक संदेश गेला,यासाठी मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल विभागाचे प्रमुख किरण भोगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली.

जामखेड नगरपरिषदेत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एकुण 743 घरकुले मंजुर झालेली आहेत, यातील 539 घरकुलांचे बांधकामे सध्या सुरु झाली आहेत. यापैकी 328 घरकुलांची कामे आज अखेरपर्यंत पुर्ण करण्यात आलेली आहेत. दुसऱ्या डीपीआरमध्ये 205 घरकुले मंजुर झाली आहेत, पहिल्या डीपीआरमधील मंजूर असलेल्या घरकुलांसाठी अडीच लाखांपैकी दोन लाख 20 हजारांचे अनुदान प्राप्त झालेले आहे.

तर दुसऱ्या डीपीआरमधील 205 पैकी 189 लाभार्थ्यांना प्रती घरकुल एक लाख रूपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे. यातील उर्वरित 16 लाभार्थ्यांना लवकरच अनुदान प्राप्त होणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी दिली.

मंजूर 743 घरकुलांपैकी 599 घरकुलांना बांधकाम परवाना देण्यात आलेला आहे. यातील 60 लाभार्थ्यांनी बांधकाम परवाना घेऊनही काम सुरु केलेले नाही तसेच ऊर्वरित 144 लाभार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह नगरपरिषदेेकडे अर्ज देऊन बांधकाम परवानगी घ्यावी व लवकरात लवकर घरकुलाचे बांधकाम सुरू करून पूर्ण करावे, असे अवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील घरकुल (शहरी) बांधकाम पुर्ण झालेली आकडेवारी काय सांगते ?

  1. जामखेड : 328
  2. श्रीरामपुर  : 303
  3. कोपरगाव : 183
  4. राहुरी : 151
  5. श्रीगोंदा 122
  6. पारनेर : 109
  7. नेवासा : 106
  8. कर्जत : 105
  9. देवळाली प्रवरा : 90
  10. पाथर्डी : 85
  11. शेवगाव : 80
  12. संगमनेर : 74
  13. अकोले : 68
  14. शिर्डी : 58
  15. राहता : 43
  16. अहमदनगर मनपा : 30